Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेकरांनी अनुभवला कोंडाजी फर्जंद यांच्या पन्हाळा विजयाचा इतिहास चाळीस फूटाची भव्य...

पुणेकरांनी अनुभवला कोंडाजी फर्जंद यांच्या पन्हाळा विजयाचा इतिहास चाळीस फूटाची भव्य प्रतिकृती आणि हजारो दिव्यातून उलगडली युद्धकथा ; इतिहास प्रेमी मंडळातर्फे आयोजन

पुणे : अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकून दाखविला. जो पन्हाळा किल्ला चाळीस हजार फौज घेऊन चार महिने प्रयत्न करुनही सिद्दी जौहर ला जिंकून घेता आला नाही, तो किल्ला व पन्हाळा विजयाचा अद्भुत रणसंग्राम भव्य प्रतिकृतीमधून पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे.

इतिहास प्रेमी मंडळातर्फे चाळीस फूटाची आणि हजारो दिवे लावलेली भव्य प्रतिकृती शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा येथे पुणेकरांना पाहण्यास खुली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त ब्रिगेडियर शरद लुकतुके यांच्या हस्ते आणि संत तुकारामांचे वारसदार शिरिष महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, या प्रदर्शनात पन्हाळ्यावरील सज्जा कोठी, तीन दरवाजा, अंबरखाना, राजवाडा अशा विविध वास्तूंच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती मांडल्या आहेत. दोरावरुन कडा चढणा-या , रणांगणात युद्ध करणा-या मावळ्यांच्या मूर्ती पाहून बाळ गोपाळांना इतिहास जिवंत झाल्याचा भास होतो. साठ वीरांनी प्रचंड दुर्ग जिंकण्याची ही चित्तथरारक कथा ऐकताना प्रेक्षक रोमांचित होतात. इतिहासातील हा अद्भुत रणसंग्राम अनुभवण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी होत असते.

जगाच्या इतिहासातील ही अद्भुत घटना होती. या विषयावर समकालीन कवी जयराम पिंड्ये यांनी ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ हा काव्यग्रंथ लिहिला होता. चाळीस फूटाची भव्य प्रतिकृती, अभ्यासपूर्ण निवेदन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, हजारो दिव्यातून उलगडत जाणारी युद्धकथा या वैशिष्ट्यांमुळे हे प्रदर्शन लोकप्रिय झाले आहे. इतिहास प्रेमी मंडळ मागील १९ वर्षे दिवाळी किल्ला दृकश्राव्य प्रदर्शन भरवत आहे.

हे प्रदर्शन दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते १० या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी इतिहास विषयक ग्रंथांचे भव्य विक्री केंद्र ही असणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही शेटे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments