दिनांक-१५/११/२०२४
झोपडपट्टी भागात मतदार जागरूकता पसरवणे हे महत्वाचे असून तेथील नागरिकांना मतदानाबाबत मार्गदर्शन व माहिती मिळाल्यास ते निश्चितपणे मतदानाचा हक्क बजावतील असे मत पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी व्यक्त केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे मार्गदर्शनाखाली २०६, पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्यास नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी उपस्थित मतदारांना २० नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रीयेबाबत माहिती देण्यात आली, तसेच शासकीय मतदान मार्गदर्शिकेचेही वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याच निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, निलेश जगताप, महादेव डोंगरे तसेच आनंदनगर झोपडपट्टी परिसरातील शेकडो नागरीक उपस्थित होते.


