पुणे, दि. २५ – एकविरा प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या “नवउद्योजकांची यशोगाथा” या पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी (२७ नोव्हेंबर) पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न होत असल्याची माहिती प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली. डॉ. दीपक शिकारपूर यांचे हे ५८ वे पुस्तक प्रकाशित होत आहे.
हा प्रकाशन समारंभ बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात सकाळी ११ वाजता होत असून यावेळी पिनॅकल ग्रुपचे प्रमुख व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
या पुस्तकाबद्दल बोलताना डॉ. शिकारपूर म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योजक हे नावीन्य, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीचे मुख्य चालक आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन दशकात अनेक पहिल्या पिढीतले उद्योजक तयार झाले. “नवउद्योजकांची यशोगाथा” या पुस्तकात अशा ४७ नवउद्योजकांचा प्रवास रेखाटला आहे. विविध क्षेत्रातील हे उद्योजक युवा पिढीतले आयकॉन्स आहेत. या पुस्तकात स्टार्टअप नवउद्योजकांना मदत करणाऱ्या संस्था देआसरा, पिनॅकल एआयसी, एमसीसीआयए या संस्थांची माहिती देखील वाचायला मिळणार आहे. इन्फोसिस, पर्सिस्टंट, बेलराइज इंडस्ट्रीज या उद्योगांचा जीवनप्रवासही वाचकांना अनुभवायला मिळेल.
———————-
ज्येष्ठ संगणतज्ज्ञ यांच्या ५८ व्या “नवउद्योजकांची यशोगाथा” या पुस्तकाचे येत्या बुधवारी प्रकाशन*
RELATED ARTICLES


