**
पुणे , २७ नोव्हेंबर —-
” सध्याच्या असंवेदनशील वातावरणात प्रतिभाताईंनी आपल्या काव्याद्वारे संवेदना तर जपलीच परंतु त्याचबरोबर प्रेमाचा सर्वत्र आविष्कार केला. आपले पती, दिवंगत अभिनेते शाहू मोडक यांचा त्यांना कधीच विसर पडला नाही ते गेल्यानंतरही त्यांचा सहवास त्यांनी सातत्याने जपला आणि त्याच्या आधारेच सर्वांना प्रेम दिले. आपल्या हृदयातील स्पंदने कायम जागृत ठेवूनच त्यांनी पुढे वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळेच त्यांची प्रत्येक कविता ही प्रेमाच्या अविष्काराची स्पंदन बनली आहे हेच त्यांच्या ‘स्पंदन’ काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि कवी श्री विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले
‘स्नेहल’ प्रकाशनातर्फे मंगळवारी प्रतिभा ताई मोडक यांच्या ‘स्पंदन’ हिंदी काव्यसंग्रहाच्या सुधारितआवृत्तीचे प्रकाशन झाले त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे बोलत होते.
प्रतिभाताईंनी सामान्य माणसातील देवत्वाचा शोध घेऊनच आपली काव्यनिर्मिती केली. त्यामुळेच त्यांची कविता असाधारण आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध मराठी समीक्षक प्राध्यापिका माधवी वैद्य यांनीही प्रतिभाताई मोडक यांच्या काव्यसंग्रहातील विविध कवितांचा परामर्श घेताना त्यांच्या काव्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी कवितांचे केलेले रसग्रहण मर्मग्राही होते.
प्रतिभाताईंच्या कविता या मानवी जीवनातील वास्तवांना प्रेमस्पर्श करून जातात असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्नेहल प्रकाशनाचे श्री रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविकात कविता उत्स्फुर्त असेल तर ती हृदया पर्यंत पोचते प्रतिभाताईंची कविता अशीच असते त्या सकारात्मकता आहे,अध्यात्म आहे आशयघनता आहे त्यामुळे ती आस्वादकाला वाचताना आनंद तर देतेच पण जीवन कसे जगावे याचा वस्तूपाठही सांगते असे सांगितले.विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तर दीपा भंडारे यांनी ईशस्तवन आणि पसायदान सादर केले. कार्यक्रमाला जाणकार श्रोत्यांनी चांगली गर्दी केली होती.
संपर्क रवींद्र घाटपांडे संचालक स्नेहल प्रकाशन पुणे 9552579811
स्पंदन काव्यसंग्रहाचे प्रकाशन
RELATED ARTICLES


