Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांच्या वाचकांचा ‘एक तास वाचनासाठी’ पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत...

राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांच्या वाचकांचा ‘एक तास वाचनासाठी’ पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत आज दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन; सार्वजनिक ग्रंथालयांचे वाचक होणार सहभागी

पुणे, १० डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवाच्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात पुण्यासह राज्यभरातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांतील वाचकही सहभाग घेणार असून, एक तास वाचनासाठी देत साहित्य संस्कृतीचा जागर करणार आहेत.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आणि शिक्षण मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका यांच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. वाचन संस्कृतीचा कुंभमेळा म्हणून प्रसिद्धीस येत असलेल्या या महोत्सवाच्या निमित्ताने ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम आज (बुधवार, ११ डिसेंबर) दुपारी १२ ते १ या वेळेत होत आहे. या उपक्रमातून साहित्यप्रेमी पुणेकर एक तास वाचनासाठी देणार आहेत.

वाचन संस्कृतीचा जागर करणाऱ्या या उपक्रमात सर्व ग्रंथालयांच्या वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य ग्रंथालय संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सर्व शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये व त्यांची उपकेंद्रे, शासनमान्य राज्य, विभाग व जिल्हा ग्रंथालय संघ आणि शासनमान्य संशोधन संस्थांच्या ग्रंथालयांना पत्र पाठविले असून, वाचकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ग्रंथालयाच्या वाचकांनी असा नोंदवावा सहभाग

– राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या वाचकांनी आज (बुधवार, ११ डिसेंबर) दुपारी बारा ते एक या वेळेत आवडत्या पुस्तकाचे वाचन करत ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात सहभाग नोंदवावा.
– पुस्तक वाचतानाचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढावा.
– पुस्तक वाचतानाचे छायाचित्र किंवा व्हिडिओ pbf24.in/register या लिंकवर पाठवावे.
– सोशल मीडियावर #पुणेपुस्तकमहोत्सव यासह छायाचित्र किंवा व्हिडिओ पोस्ट करावे.
– सहभागी वाचकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments