पुणे, दि. 13 : शाश्वत विकासाच्या उद्दिष्टासाठी ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होत अधिकाधिक कुष्ठरुग्ण औषधोपचाराखाली आणण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित कार्यालयात कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. दीपक साळुखे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शाश्वत विकास ध्येयाचे उद्दिष्ट शून्य कुष्ठारोगाचा प्रसार सन 2027 पर्यंत साध्य करण्यासाठी पुणे जिल्ह्यात कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसूम) हे अभियान दिनांक 16 ते 20 डिसेंबर 24 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत समाजातील वंचित व स्थलांतरित लोकसंख्येत तपासणी होणार आहे. जेणेकरून संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी होऊन कुष्ठरोगाचे निदान होईल व त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहे.
*****


