Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकाच प्रकारच्या कोर्टवर अवलंबून चालणार नाही - ओ.पी.गुप्ता - पीवायसीच्या नूतनीकरण...

एकाच प्रकारच्या कोर्टवर अवलंबून चालणार नाही – ओ.पी.गुप्ता – पीवायसीच्या नूतनीकरण केलेल्या टेनिस कोर्ट व बास्केटबॉलचे अनावरण

पुणे, २० जानेवारी २०२४ – शहरातील क्रीडा क्षेत्रात एक मानाचे स्थान असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकताना टेनिस कोर्टचे झपाट्याने केलेले नूतनीकरण हे कौतुकास्पद आहे., तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी आपल्याला एकाच प्रकारच्या कोर्टवर टिकून राहता येणार नाही, असे मत महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व क्रिडा सचिव ओ. पी. गुप्ता यांनी व्यक्त केले.

 

पीवायसीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच अन्य सुविधांचे शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, आशियाई स्पर्धेतील पदक विजेती व अर्जुन पुरस्कार विजेती प्रख्यात टेनिसपटू अंकिता रैना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे चेअरमन प्रशांत सुतार, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागू, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, हेमंत बेंद्रे आणि क्लबचे समिती सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

 

अन्य प्रकारची कोर्टही अशाच चांगल्या पद्धतीने तयार व्हायला हवी, ही आता काळाची गरज आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने खेळाची प्रगती झपाट्याने होत आहे. सरकारही क्रीडाक्षेत्राकडे बारीक लक्ष देत आहे. यातून अधिक चांगली क्रीडा प्रगती पहायला मिळेल आणि त्याला पीवायसीची साथ मिळेल अशी आशाही ओ.पी.गुप्ता यांनी या वेळी व्यक्त केली.

 

एकाच प्रकारच्या कोर्टवर अवलंबून राहता येणार नाही हे सत्य देखील आपण स्विकारायला हवे. टेनिसमध्ये काम करताना अगदी सुरुवातीपासून कुमार ताम्हाणे यांनी साथ लाभली. त्यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच आज फळाला आले आहेत. शहराच्या टेनिस प्रगतीत त्यांची साथ मोठी आहे हे विसरून चालणार नाही, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले.

 

माझ्या कारकिर्दीत पीवायसीला मोठे स्थान आहे. अहमदाबादहून मोठी स्वप्ने घेऊन येथे आले होते. सर्वप्रथम पीवायसीने मला स्विकारले आणि येथेच माझ्या कारकिर्दीला वळण मिळाले. हेमंत बेंद्रे यांच्यासारखे झोकून देणाऱ्या प्रशिक्षकांमुळे माझ्या खेळात झपाट्याने प्रगती झाली. भारतासाठी खेळण्याचे स्वप्न घेऊन मी येथे आले पण, मला त्यापेक्षा खूप काही पीवायसीने दिल्याचे अर्जुन पुरस्कार विजेती टेनिसपटू अंकिता रैनाने सांगितले.

 

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी रोजची सकाळ येथे घालवत असल्याच्या आठवणी सांगितल्या. पीवायसीचे भवितव्य उज्ज्वल आहे. भविष्यात या कोर्टचा अधिक खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा, असेही करीर म्हणाले.

 

क्लबचे सचिव सारंग लागू यांनी कोर्टच्या नूतनीकरणाचे काम तीन महिन्यात कसे झटपट करण्यात आले आणि पीवायसीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कशी साथ दिली याची माहिती दिली. या कामात सहाकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करताना लागू यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments