पुणे ५ फेब्रुवारी २०२५ : सात दशकांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा असलेल्या पुण्यातील कॅम्प मधील ईस्ट स्ट्रीट येथील ‘एक्सप्रेस बुक सर्व्हिस’ ला हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या आयआरओ साहित्य महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट बुक स्टोअर २०२५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ७व्या इंडियन रिडींग ऑलिम्पियाड (आयआरओ ) पुरस्कार सोहळ्यात एक्सप्रेस बुक सर्विस चे संस्थापक रोहित जेराजानी यांना प्रदान करण्यात आला.
हैदराबाद येथे १८ जानेवारी रोजी पार पडलेल्या आयआरओ साहित्य महोत्सव २०२५ चा हा पुरस्कार एक भाग होता. आयआरओ व पुरस्काराचे उद्धिष्ट हे लोकांना पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करणे आहे.
पुरस्कार स्वीकारतांना रोहित जेराजानी यांनी सांगितले की एक्सप्रेस बुक सर्व्हिस हे त्यांचे आजोबा कै.जमनादास जेराजानी यांनी सुरु केलेल्या अनेक बुक शॉप्स पैकी एक आहे. १९७२ मध्ये रोहित जेराजानी यांचे वडील कै.मनुभाई जेराजानी यांनी पुण्यातील दुकानाची धुरा सांभाळली. एक्सप्रेस बुक सर्व्हिसला सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, जेआरडी टाटा अशा अनेक नामवंत मंडळींनी भेट दिली.
विशेष बाब म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायणमूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती लग्नाआधी येथे अनेक वेळा यायचे आणि ही आठवण म्हणून ह्या दुकानात ‘मूर्ती कॉर्नर’ प्रस्थापित करण्यात आले आहे.
जेराजानी म्हणाले की ‘बुक्स ऑन व्हील्स’ ,पुण्यात विविध कंपन्यांमध्ये पुस्तके घेऊन जाणे, पुण्यातील कार्य्रक्रमात विविध लेखकांना बोलण्यासाठी आमंत्रित करणे, पुण्यात आणि भारताबाहेर साहित्य महोत्सव आयोजित करणे, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पीड रिडींग कार्यशाळा अशा अनेक उपक्रमाद्वारे एक्सप्रेस बुक सर्व्हिसच्या कार्याचा विस्तार करण्यात आला.
आजच्या काळात लहान मुलांच्या हातात गेलेले मोबाईल फोन आणि ऑफलाइन व ऑनलाइन बनावट पुस्तकांची विक्री हा पुस्तक विक्रेत्यांसाठी मोठा धोका आहे असे ते म्हणाले .


