Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्याचे पिंपरी -चिंचवड महापालिकेचे आदेश

अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्याचे पिंपरी -चिंचवड महापालिकेचे आदेश

पिंपरी, दि. ७ फेब्रुवारी २०२५ – गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्स चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

चौकट – आर.ओ प्लांट अनिश्चित काळासाठी राहणार बंद
गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि आर.ओ प्लांट्सवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

चौकट – प्रभागनिहाय करण्यात येणार कारवाई
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर आणि सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयाने तसेच आरोग्य वैद्यकीय विभागाकडून परवान्याबाबत तपासणी करूनच या प्लांट्सच्या बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय आर.ओ प्रकल्प (प्लांट) बंद बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

चौकट – नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिका कटिबद्ध
दूषित भूजलाचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केल्याने गिलियन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आर.ओ प्लॉन्ट्स बहुतेक वेळा परवाना किंवा सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करता पाणी पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो. नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

कोट
गिलियन बेरे सिंड्रोमच्या (GBS) पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतल्यानंतरच संबंधित प्लांट्सना परवानगी देण्यात येणार आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments