पुणे, 9 मार्च 2025 : आजकाल कमी वयातच मधुमेह, रक्तदाब आणि वजन या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याचा कालांतराने मुत्रपिंडावर होणारा परिणाम देखील दिसून येत आहे. म्हणूनच या गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो,असे मत वरिष्ठ मुत्ररोग तज्ञ आणि एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या परिणामांबरोबरच मुतखडा व मुत्रपिंडामध्ये होणाऱ्या जंतूसंसर्ग संबंधित रूग्णांची संख्या देखील वाढत आहे,ही चिंतेची बाब आहे.
डॉ.पाटणकर म्हणाले की,मुत्रपिंडाचे आजार हे अनेक कारणांमुळे होऊ शकतात,ज्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह वजन,चुकीचा आहार,जंतूसंसर्ग इत्यादींचा समावेश आहे. इतर अवयवांप्रमाणे मुत्रपिंडाबाबत जागरूकता नसल्याने वेळेत निदान होत नाही आणि गुंतागुंत वाढते.
दरवर्षी 13 मार्च रोजी जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जाते.यावर्षीची संकल्पना आर युवर किडनीज् ओके? डिटेक्ट अर्ली प्रोटेक्ट किडनी हेल्थ ही आहे.डॉ.पाटणकर पुढे म्हणाले की, म्हणूनच आजकालच्या प्रतिबंधात्मक चाचण्यांमध्ये रक्तातील साखर,रक्तदाब व हृदयाशी संबंधित चाचण्यांसह सोनोग्राफी व युरिन टेस्ट यांना समाविष्ट करणे फायद्याचे ठरेल.
हातापायावर किंवा चेहऱ्यावर आलेली सूज,लघवीचा गडद रंग,श्वास घेण्यात त्रास,थकवा,मळमळ,उलट्या ही लक्षणे मुत्रपिंडाच्या समस्यांशी निगडीत असू शकतात.जोखमीच्या घटकांमध्ये मधुमेह,वजन,उच्च रक्तदाबासह धुम्रपाना सारख्या चुकीच्या सवयी,अनुवंशिक घटक आणि सिरम लिपिडची (रक्तातील चरबी) वाढलेली पातळी यांचा समावेश आहे.
डॉ.पाटणकर म्हणाले की,मुत्रपिंडावर परिणाम झाल्यास पुढील टप्प्यात डायलिसीस किंवा प्रत्यारोपण हेच पर्याय उरतात.म्हणून युरिन टेस्ट आणि सोनोग्राफी यासारख्या साध्या चाचण्यांद्वारे लवकर निदान हाच मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी योग्य मार्ग आहे.
मूत्रपिंडाची काळजी घेण्यासाठी दहा महत्वपूर्ण टिप्स –
* रोज पुरेसे पाणी प्या
* योग्य आहार घ्या
* मूत्राचा आवेग रोखू नका
* मीठ अतिप्रमाणात खाऊ नका
*आरोग्यदायी पेयांचे सेवन
*योग्य व नियमित व्यायाम करा
*मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग काबूत ठेवा
*डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा
* पूरक (सप्लिमेंट) व हर्बल औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
* धूम्रपान व मद्यपान टाळा


