पुणे, दि. १- भारतीय महिला स्वदेश, स्वसंस्कृती आणि स्वत्व जपत अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्त्रीच्या या स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला संमेलन बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बी.एम.सी.सी.), पुणे येथे रविवार दिनांक ४ फेब्रूवारी रोजी होणार आहे. हे संमेलन सकाळी १० ते सायंकाळी ४ .३० या वेळात संपन्न होईल, अशी माहिती संमेलनाच्या संयोजिका सौ. संपदाताई खोले व पश्चिम महाराष्ट्र प्रांत संमेलन सहसंयोजिका ॲड. अपर्णा नागेश पाटील यांनी दिली.
त्या म्हणाल्या, की संमेलनाच्या उद्घाटन सत्राला इस्रो संस्थेच्या शास्त्रज्ञ माधवीताई ठाकरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. चांद्रयान ३ मोहिमेमध्ये माधवीताईंचा सक्रिय सहभाग होता आणि या निमित्ताने एका कर्तृत्वान महिला शास्त्रज्ञाचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. उद्घाटन सत्रात प्रमुख वक्त्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा पद्मश्री निवेदिताताई भिडे असून त्या “भारतीय महिला विषयक चिंतन” या विषयावर सविस्तर विचार मांडणार आहेत.
संमेलनाच्या समारोप सत्राला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री विभावरी देशपांडे प्रमुख पाहुण्या असतील. तसेच सामाजिक कार्यकर्त्या व प्रज्ञा मानस संशोधिका (ज्ञानप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी) संस्थेच्या संचालक अनघाताई लवळेकर “भारताच्या विकासात महिलांची भूमिका” यावर आपले विचार मांडतील. या दरम्यान “महिलांची सद्यस्थिती, समस्या व उपाययोजना” या विषयावर गटचर्चेच्या माध्यमातून विचार मंथन होईल.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलाविषयक विचार, महिलांची स्थिती, महिलांचा देशकार्यातील सहभाग इत्यादींबाबत विचार करावा, त्यांचे वैचारिक आदान प्रदान व्हावे आणि विविध विषयावर वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने देशभरात महिला संमेलनांचे आयोजन केले जात आहे. पुण्यातही विविध भागात अशी संमेलने आयोजित केली गेली. त्याचाच भाग म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
महिलांनी एकत्र यावे व त्यांच्यातील ऊर्जा अधिक संपन्न होऊन सर्वांपर्यंत पोहोचावी त्यांच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी हे या संमेलनचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संमेलनात महिलांचे विविध प्रश्न, समस्या व त्यावर उपाय योजना यावर चर्चा होईल. तसेच महिलांचा राष्ट्र निर्माण कार्यातील सहभाग काय आहे, कसा असावा व तो कसा वाढेल? याचा आढावा संमेलनात घेण्यात येणार आहे. तरी महिलांनी बहुसंख्येने या संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन संमेलनाच्या संयोजिका संपदा खोले यांनी केले आहे.
संयोजिका
सौ . संपदा खोले (मो. ९८८१५६२९३६)
सहसंयोजिका
सौ. गौरी देशपांडे,विद्यापीठ भाग (मो. ९८२२५७४०८६)
सौ . विद्या देशपांडे ,संभाजी भाग (मो. ९४२२३२२९९८)
सौ.मंजुषा कुलकर्णी,कसबा भाग (मो. ९८५०२०८००९)


