पुणे, ता. २९ ः सु. ल. खुटवड यांनी लिहिलेल्या ‘नस्ती पंचाईत’, ‘ जनूभाऊ’, ‘कागदी घोडे’, ‘हास्याची लाट’ आणि ‘विनोदाचं गु-हाळ’ या पाच पुस्तकांचा प्रकाशनसोहळा हशा आणि टाळ्यांच्या गजरात पार पडला.
या कार्यक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध किस्से, आठवणी त्याचबरोबर या पाच पुस्तकांतील विनोदी लेखनाचा संदर्भ देत वक्त्यांनी जोरदार बॅटिंग करत हास्याची मैफिल रंगवली.
ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले, प्रसिद्ध वक्ते, साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, मेहता पब्लिकेशन हाऊसचे सर्वेसर्वा अखिल मेहता व पाचही पुस्तकांचे लेखक सु. ल. खुटवड व्यासपीठावर उपस्थित होते.
मंगला गोडबोले म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागातून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या व लेखनाची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या मात्र, विनोदी लेखनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सु. ल. खुटवड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला मी येथे आले आहे. दै. ‘सकाळ’, विविध दिवाळी अंक आणि अनेक पुस्तकांमधून त्यांचे साहित्य मी वाचत आले आहे. विनोदातील विविध प्रकार हाताळताना त्यांना पत्रकारितेचा मोठा फायदा झालेला दिसून येतो. शाब्दिक कोट्यांमध्ये न अडकता त्यांनी आपली वेगळी शैली विकसित केली. प्रसंगनिष्ठ विनोदावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे त्यांचा विनोद कालबाह्य वाटत नाही. वाचकांचा त्यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून माझ्याप्रमाणे अनेकांना त्यांचा हेवा वाटतो. पंचनामाची पुस्तके प्रकाशित करा, यासाठी वाचकमंडळीच पुढाकार घेतात आणि त्यासाठी काहीजण पन्नास ते एक लाख रूपये कोणतीही अपेक्षा न ठेवता देऊ इच्छितात, हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण त्यांच्याबाबत घडले. त्यांचं साहित्य वाचून फोन करणारे आणि प्रत्यक्ष भेटायला येणाऱ्या हजारो वाचकांचं त्यांना प्रेम मिळालं, यासाठी ते खरंच भाग्यवान आहेत. मात्र, आता एवढी प्रसिद्धी आणि नाव कमावल्यानंतर त्यांनी कंम्पर्ट झोनच्या बाहेर यायलं हवं, असं वडिलकीच्या नात्याने मी त्यांना सल्ला देऊ इच्छिते. साहित्यातील आणखी वेगळ्या वाटा त्यांनी चोखाळल्या पाहिजेत. गेल्या काही वर्षात मराठी साहित्यात उत्तम विनोदी कादंबरी कोणी लिहिली नाही. खुटवड यांनी ते आव्हान पेलावं, असं मनोमन वाटतं. त्यांचे लेखन वाचल्यानंतर त्यांच्यात ती क्षमता आहे, याची खात्री पटते. मेहता पब्लिकेशन ही कादंबरी प्रसिद्ध करायला तयारच असेल. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रकाशकाचाही काही प्रश्न नसेल. ’’
प्रा. मिलिंद जोशी यांनी खुटवड यांच्या पाचही पुस्तकांतील विनोदाची वैशिष्ट्ये उदाहरणांसह उलगडून दाखवली. त्याचबरोबर पुस्तकांतील काही चटकदार वाक्येही सांगून हशा पिकवला. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ मराठी साहित्य विश्वातील विनोदाची पातळी गंभीर अवस्थेत पोचली आहे. विनोदी साहित्य उदंड लिहिलं जातंय. मात्र, कसदारपणाचा त्यात अभाव आहे. आपलं साहित्य वाचून वाचकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं जाणार नाही, याची दक्षता लेखकमंडळी घेत आहेत, की काय अशी शंका येते. या पार्श्वभूमीवर खुटवड यांचे लेखन दिलासा देणारे आणि विनोदी साहित्याची पताका उंच फडकवत ठेवणारे आहे. त्याचबरोबर वाचकांचा ताण- तणाव दूर करून, निखळ हास्य देणारे आहे. विनोदाचे असंख्य प्रकार त्यांनी यशस्वीरीत्या हाताळून, स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला आहे. ‘सकाळ’मधील पंचनामा सदराने लोकप्रियतेबरोबरच अनेक विक्रमही मोडले आहेत. आगामी काळात त्यांच्याकडून अशा अनेक विक्रमांची नोंद व्हावी, अशा शुभेच्छा देतो. मेहता पब्लिकेशनने गेल्या काही वर्षात एकाचवेळी पाच पुस्तके प्रकाशित केली नसावीत. आज मात्र त्यांनी ते काम केले आहे, ही आनंदाची बाब आहे. ’’
अखिल मेहता यांनी या पाच पुस्तकांच्या प्रकाशनामागील आपली भूमिका विशद केली.
खुटवड यांनी हे सदर लिहिताना आलेले अनेक अनुभव, किस्से, वाचकांचा प्रतिसाद याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले, ‘‘ लेखक म्हणून अतिशय समृद्ध करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा असाच पंचनामाचा लेखनाचा काळ होता. प्रचंड लोकप्रियता आणि मानसन्मान या सदराने मला दिला. खरं तर लेखकाच्या नावाशेजारी त्याचा मोबाईल नंबर ‘सकाळ’मध्ये कधीही प्रसिद्ध केला जात नाही. मात्र, अनेक वाचक सकाळ कार्यालयात मला भेटायला येऊ लागले. यात अनेक ज्येष्ठांचा समावेश होता. मात्र, भेट न झाल्याने त्यांना हेलपाटा पडू लागला. त्यामुळे संपादक सम्राट फडणीस यांनी लेखकाच्या नावाशेजारी मोबाईल नंबर प्रसिद्ध करायचा निर्णय घेतला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. वर्षभरात सुमारे १४ हजार वाचकांनी संपर्क साधून माझा आत्मविश्वास वाढवला. यात महिलांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर परदेशातीलही अनेक नागरिकांनीही ई सकाळवर हे सदर वाचून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ’’
प्रा. डाॅ. गीता मांढरे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. प्रतिक येतावडेकर यांनी आभार मानले.


