Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedतुळशीबागेतील २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा श्री रामजी...

तुळशीबागेतील २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन

पुणे : बाळा जो जो रे… कुलभूषणा दशरथ नंदना… बाळा जो जो रे… चे स्वर पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले आणि रविवारी दुपारी १२.४० वाजता श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला. यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने मंदिराला फुलांच्या आकर्षक आरास आणि विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्रीरामजन्म सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली हे देखणे मंदिर स्थापन केले आहे.

 

मुख्य पूजेनंतर रविवारी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

 

श्रीरामराज्याभिषेक सोहळा मंगळवारी (दि.८)

मंगळवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर, शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments