पुण्यात अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा प्रयोगशाळा सुरू; २०२६-२७ मध्ये वर्षभर विविध राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन
“Ensuring Safer and Secure Mobility” (सुरक्षित व संरक्षित वाहतुकीची हमी) या संकल्पनेवर आधारित वर्षभराचा कार्यक्रम सप्टेंबर 2026 ते सप्टेंबर 2027 या कालावधीत राबविण्यात येणार
पुणे, 5 नोव्हेंबर 2026: वाहन चाचणी, प्रमाणन, होमोलोगेशन आणि वाहतूक क्षेत्रातील क्षमता विकासासाठी कार्यरत असलेली भारतातील शिखर संस्था, केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), पुणे यांनी आज भोसरी येथील आपल्या परिसरात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हीरक महोत्सवी वर्षाचा आराखडा सादर केला. सेवेची 59 वर्षे पूर्ण करून सप्टेंबर 2026 मध्ये 60 व्या वर्षात पदार्पण केलेल्या संस्थेने या प्रसंगी वाहन सुरक्षा, रस्ते सुरक्षा आणि — वाढत्या प्रमाणात — कनेक्टेड वाहनांच्या सायबर सुरक्षेतील आपल्या विस्तारत्या भूमिकेची माहिती दिली. माध्यम प्रतिनिधींना सीआयआरटीच्या नव्याने स्थापन झालेल्या ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा पेनिट्रेशन टेस्टिंग प्रयोगशाळेची मार्गदर्शित भेटही घडविण्यात आली.
5 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), पुणे येथील पुढील अधिकाऱ्यांनी माध्यमांना संबोधित केले:
डॉ. देवेंद्र सिंह, संचालक, सीआयआरटी
श्री शेखर ढोले, प्रमुख, तांत्रिक सचिवालय
श्री फारुख मखदूम, प्रमुख, ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा व व्यवस्थापन विकास केंद्र (MDC)
डॉ. मंगेश पाठक, प्रमुख, सुरक्षा व होमोलोगेशन
श्री संजय साळुंखे, प्रमुख, ऑटोमोटिव्ह चाचणी विभाग
श्री उमेश सूर्यवंशी, प्रमुख, संशोधन व सल्लागार सेवा
श्रीमती शीबा राणी, शास्त्रज्ञ ‘डी’ व प्रमुख, प्रशिक्षण (MDC)
श्री प्रकाश दहिया, शास्त्रज्ञ ‘सी’ व प्रमुख, तांत्रिक संचालनालय
श्री प्रशांत काकडे, प्रभारी, रस्ते सुरक्षा कक्ष
श्री संकेत धनावे, प्रभारी, भारत NCAP
भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) आणि असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (ASRTU) यांच्या संयुक्त पुढाकाराने 1967 मध्ये सीआयआरटीची स्थापना झाली. देशभरातील राज्य परिवहन उपक्रमांसाठी चाचणी व क्षमता विकास हे संस्थेचे मूळ उद्दिष्ट होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते हीरक महोत्सवी सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन आणि महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
“गेली सहा दशके आमच्या प्रयोगशाळांमधून चाचणी होऊन बाहेर पडलेल्या प्रत्येक सुरक्षित वाहनामागे आणि घटकामागे सीआयआरटी ठामपणे उभी आहे. भारत कनेक्टेड, सॉफ्टवेअर-डिफाइंड, इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित वाहनांकडे वाटचाल करत असताना, वाहनाची सुरक्षा आता त्याच्या डिजिटल प्रणालींच्या सुरक्षिततेवरही अवलंबून आहे. हा वारसा जपत असतानाच भारतीय वाहतूक क्षेत्राच्या पुढील टप्प्यासाठी आवश्यक असलेली चाचणी, प्रमाणन आणि मनुष्यबळ क्षमता उभारणे, हाच आमच्या हीरक महोत्सवी वर्षाचा उद्देश आहे.” — डॉ. देवेंद्र सिंह, संचालक, सीआयआरटी
भारताच्या वाहन सुरक्षा व्यवस्थेच्या उभारणीची सहा दशके
राष्ट्रीय पातळीवरील अनेक ‘पहिल्या’ उपलब्धी आणि वैधानिक जबाबदाऱ्या हे सीआयआरटीच्या वाटचालीचे वैशिष्ट्य आहे. संस्थेने भारतातील पहिली टायर व व्हील रिम प्रयोगशाळा उभारली आणि 1994 मध्ये CMVR नियम 124 अंतर्गत MoRTH कडून प्राधिकृत झाली. 2007 मध्ये CMVR नियम 126 अंतर्गत संपूर्ण वाहन होमोलोगेशनसाठी चाचणी संस्था म्हणून मान्यता मिळाली आणि त्याच वर्षी प्रयोगशाळांना NABL मानांकन प्राप्त झाले. 2017 या सुवर्ण महोत्सवी वर्षात सीआयआरटीने भारतातील पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे प्रमाणन केले आणि चालक मूल्यमापन प्रणालीसाठी संस्थेला पहिले पेटंट मिळाले. त्यानंतर GSR 870 (2019) अंतर्गत आयात वाहनांच्या प्रमाणनासाठी प्राधिकृती, भारत NCAP साठी कमांड व कंट्रोल सेंटर म्हणून नियुक्ती (2023), व्हर्च्युअल सिम्युलेशन प्रयोगशाळा कार्यान्वित (2024) आणि ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा विभागाची स्थापना (2025) असे महत्त्वाचे टप्पे संस्थेने गाठले आहेत.
10
NABL-मानांकित प्रयोगशाळा (ISO/IEC 17025) 80,000+
2,000+ कार्यक्रमांतून प्रशिक्षित अधिकारी 38
भारत NCAP अधिकृत सुरक्षा मानांकने (आर्थिक वर्ष 2023–24 ते 2025–26) 115+
महाराष्ट्र, ओडिशा व गुजरातमध्ये कार्यान्वित स्वयंचलित ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
चाचणीव्यतिरिक्त, सीआयआरटी 3.5 टनांपेक्षा अधिक GVW असलेल्या वाहनांसाठी AISC सचिवालय म्हणून, तसेच रस्ते वाहतूक सुरक्षेसाठीच्या UNECE जागतिक मंच WP.1 साठी MoRTH चे सचिवालय म्हणून कार्य करते. संस्थेला BIS व SIRO मान्यता प्राप्त आहे. MoRTH अर्थसहाय्यित योजनांसाठी देखरेख, अंमलबजावणी व प्रकल्प व्यवस्थापन संस्था म्हणून सीआयआरटी 31 चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था (IDTR), 22 प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रे, 82 चालक प्रशिक्षण केंद्रे आणि 5 स्वयंचलित फिटनेस चाचणी केंद्रे यांच्या राष्ट्रीय जाळ्याला सहाय्य करते, तसेच इलेक्ट्रिक, डिझेल व सीएनजी बस खरेदीबाबत राज्यांना मार्गदर्शन करते. चालक मूल्यमापनात पारदर्शकता, वस्तुनिष्ठता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी AI-आधारित स्वयंचलित ड्रायव्हिंग टेस्ट प्रणाली (ADTS) राबविण्याकरिता राज्य परिवहन विभाग व केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) सेवा पुरविते.
वाहन सुरक्षेपासून सुरक्षित, कनेक्टेड वाहतुकीपर्यंत
आधुनिक वाहनांमध्ये डझनभर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स, टेलिमॅटिक्स जोडण्या आणि ओव्हर-द-एअर (OTA) सॉफ्टवेअर अपडेट्स असतात — आणि यातील प्रत्येक घटक सायबर हल्ल्याचा संभाव्य मार्ग ठरू शकतो. या बदलाला प्रतिसाद म्हणून सीआयआरटीचा ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा विभाग वाहन उत्पादक व पुरवठादारांसाठी संपूर्ण (एंड-टू-एंड) सेवा उपलब्ध करून देत आहे:
प्रमाणन व टाइप अप्रूव्हल: अनुपालन प्रमाणपत्रे (Certificates of Compliance) जारी करण्यासाठी CSMS व SUMS ऑडिट, तसेच AIS-189 व AIS-190 अंतर्गत वाहन टाइप अप्रूव्हल.
सायबर सुरक्षा चाचणी व VAPT: ECU, गेटवे, टेलिमॅटिक्स, इन्फोटेनमेंट आणि वाहनांतर्गत नेटवर्कचे व्हल्नरेबिलिटी असेसमेंट व पेनिट्रेशन टेस्टिंग.
विशेष मूल्यमापन: MoRTH च्या V2X उद्दिष्टांना पूरक ठरणारी OTA अपडेट्स, V2V/V2X संवाद आणि EV चार्जिंग इंटरफेसची सुरक्षा तपासणी.
क्षमता विकास: सीआयआरटीच्या व्यवस्थापन विकास केंद्रामार्फत OEM, टियर-1/टियर-2 पुरवठादार, चाचणी संस्था व नियामकांसाठी नियमावलीशी सुसंगत प्रशिक्षण.
हे कार्य AIS-189/AIS-190, UN नियमावली R155/R156, ISO/SAE 21434 आणि ISO 24089 यांच्याशी सुसंगत आहे. सीआयआरटीच्या निःपक्षपातीपणा धोरणानुसार सल्लागार सेवा आणि प्रमाणन सेवा स्वतंत्र पथकांमार्फत दिल्या जातात.
“सायबर सुरक्षा ही आता वाहन सुरक्षेची अनिवार्य अट आहे, केवळ अतिरिक्त सुविधा नाही. पुण्यातील समर्पित पेनिट्रेशन टेस्टिंग प्रयोगशाळेमुळे भारतीय उत्पादक व पुरवठादार आपली वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच भारतीय तसेच UN आवश्यकतांनुसार त्यांची सायबर लवचिकता देशातच प्रमाणित करू शकतात.” — श्री फारुख मखदूम, प्रमुख – ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा व MDC, सीआयआरटी
हीरक महोत्सवी वर्ष: पुढील वाटचाल
उद्योगक्षेत्राशी सहकार्य दृढ करण्यासाठी आणि पुढील पिढीच्या वाहतुकीसाठी क्षमता उभारण्यासाठी सीआयआरटीने सप्टेंबर 2026 ते सप्टेंबर 2027 या कालावधीत विविध कार्यक्रम व ज्ञान-आदानप्रदानाचा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला आहे:
सुरक्षित, संरक्षित व शाश्वत सार्वजनिक वाहतुकीसाठी राष्ट्रीय उपक्रम: चाचणी, प्रमाणन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीची सुरक्षा व संरक्षण वाढविणारा सीआयआरटीचा प्रमुख हीरक महोत्सवी उपक्रम.
राष्ट्रीय V2V/V2X जनजागृती व तंत्रज्ञान प्रदर्शन — कनेक्टेड वाहन तंत्रज्ञान आणि संवाद सुरक्षेवर वेबिनार व कार्यशाळा.
ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा प्रतिभा विकास परिसंस्था — विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग व्यावसायिकांसाठी जनजागृती, प्रत्यक्ष कौशल्य व प्रमाणपत्र-केंद्रित कार्यक्रम.
तांत्रिक कार्यशाळा व चर्चासत्रे — सायबर लवचिकता, बस चाचणी व प्रमाणन, ई-रिक्षा व ई-कार्ट चाचणी, वाहन नोंदणी व फिटनेस, आणि AI-आधारित स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचण्या या विषयांवर.
“मूव्हिंग इंडिया सेफली” — सर्व भागधारकांसाठी रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान.
हीरक महोत्सवी प्रदर्शन-सह-परिषद आणि समारोप सोहळा (सप्टेंबर 2027) — वाहन सुरक्षा व संरक्षण, सायबर सुरक्षा आणि CRA, V2V/V2X, भारत NCAP 2.0, चाचणी व प्रमाणन, तसेच ADAS प्रमाणीकरण या विषयांवरील राष्ट्रीय व्यासपीठ.
भारतातील रस्ते वाहतूक परिसंस्था विकसित होत असताना सीआयआरटीचे ध्येय मात्र अपरिवर्तित आहे: प्रत्येक नागरिकासाठी अधिक सुरक्षित वाहने, अधिक सुरक्षित रस्ते आणि अधिक संरक्षित वाहतूक व्यवस्था.
—-


