पुणे ६ एप्रिल २०२५ : जन्मानंतर प्रवासाची सुरवात आपल्या आयुष्याला आकार देते . नवजात बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी हाच सर्वांगीण विकासाचा पाया असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले .
जागतिक आरोग्य दिन 2025 ची संकल्पना हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर असून माता आणि नवजात बालकांचे आरोग्यावर केंद्रित आहे.माता आणि नवजात बालकांचे आरोग्य अनेक कारणांमुळे महत्त्वाचे आहे. मातांचे आरोग्य आणि नवजात बालकाच्या सुरूवातीच्या काळात आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्यास निरोगी आयुष्याची नांदी ठरते.याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यासह कुटुंब आणि समुदायाच्या कल्याणावर होतो.
नोबल हॉस्पिटल मधील प्रख्यात आयव्हीएफ तज्ज्ञ व एन्डोस्कोपी शल्यचिकित्सक डॉ.मीनू अगरवाल म्हणाल्या की, गर्भधारणा नियोजित असल्यास त्याचा फायदा होतो,याचे कारण विविध वैद्यकीय स्थिती असल्यास त्यावर नियंत्रणासाठी वेळ मिळतो.उदा.वजन जास्त असल्यास ते नियंत्रणात आणता येते,त्याचबरोबर जीवनशैलीमध्ये बदल करता येतात. याव्यतिरिक्त मधुमेहाचा कुटुंबामध्ये वैद्यकीय इतिहास,रक्तातील साखरेचे प्रमाण,उच्च रक्तदाब,हिमोग्लोबिनची पातळी या सर्व गोष्टी गरोदरपणादरम्यान आव्हानात्मक ठरू शकतात.म्हणून वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन अशा परिस्थितींवर नियंत्रण मिळवता येते.
नोबल हॉस्पिटल्स येथील एनआयसीयू मधील वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ.अनिल खामकर म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती विशेष करून शहरी भागात नाहिशी झाल्यामुळे बाळाच्या पहिल्या काही वर्षातील पोषणाकडे लक्ष द्यायला कुटुंबातील इतर व्यक्ती नसतात.एकीकडे काम आणि दुसरीकडे आपल्या पाल्याच्या सर्व गरजांकडे लक्ष देणे हे दोन्ही पालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे.पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की,गरोदरपणातील 9 महिने,9 दिवस आणि नवजात शिशूची पहिली दोन वर्षे असे मिळून पहिले एक हजार दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात.कारण यामध्येच बाळाच्या सर्वांगीण वाढीचा पाया रचला जातो.म्हणूनच गरोदरपणामध्ये नियमित तपासण्या,शारीरिक व मानसिक स्वास्थ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम हे बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. प्रसूतीनंतर पहिले सहा महिने स्तनपान आणि त्यानंतर पूरक आहाराची जोड आवश्यक आहे .
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष सिदीद यांच्या मते, आयव्हीएफच्या सहाय्यने गर्भधारणेचे प्रमाण वाढत असल्यामुळे नियमित तपासणी, वैद्यकीय देखरेख आणि रुग्णालयात प्रसूतींबद्दल पुरेशी जागरूकता करणे अधिक महत्त्वाचे बनते
.


