Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपार्किन्सन्स दिनानिमित्त पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम * रूग्णांकडून...

पार्किन्सन्स दिनानिमित्त पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम * रूग्णांकडून नृत्य-गायनाच्या सादरीकरणाद्वारे जनजागृती

पुणे,10 एप्रिल 2025 : पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या सुमारे 100 सदस्यांनी नृत्य-गायनाच्या सादरीकरणाद्वारे (क्रिएटिव्ह थेरपी) जनजागृती केली. याप्रसंगी रूग्णांनी सपोर्ट ग्रुपबरोबर जोडले गेल्यानंतरचा अनुभव व त्यातून झालेला जीवनातील बदलाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

 

पार्किन्सन डिसीज सपोर्ट ग्रुप प्रोग्राम हा बीकेपी-पीडीएमडीएसच्या माध्यमातून भारतातील अनेक केंद्राद्वारे विनामूल्य चालविला जातो. हा बहुआयामी स्वरूपातील कार्यक्रम असून यामध्येे प्रामुख्याने ऑक्युपेशनल व स्पीच थेरपी, शारीरिक व्यायाम (फ़िजिओथेरपी), लाफ्टर थेरपी, डान्स आणि म्युझिक,मूव्हमेंट थेरपी याबरोबरच योग्य पोषक आहार, योग-प्राणायाम, जेष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या इतर मेंदूविषयक आजारांवरील डॉक्टरांची व्याख्याने आणि जागरूकता सत्रांद्वारे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. हे उपक्रम बीकेपी – पीडीएमडीएसच्या प्रशिक्षित व्यक्तींद्वारे विनामूल्य आयोजित केले जातात.पुण्यात हा उपक्रम केईएम हॉस्पिटल व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पेशंट सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून चालविला जातो.

 

याप्रसंगी केईएम हॉस्पिटलचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा, केईएम हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ञ डॉ.धैर्यशील सस्ते,केईएम हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागातील समन्वयक व न्यूरो सायकॉलॉजिस्ट जेनिन गार्डा, केईएम व डीएमएच सपोर्ट ग्रुपच्या फिजिओथेरपिस्ट व समन्वयक डॉ.निकिता छाजेड आणि वॉलेंटिअर संपदा पाध्ये,डीएमएच टीम सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रुग्णांना प्रोत्साहन देण्यासाठी बी.के.पारेख यांच्या पत्नी भारती पारेख आणि मुलगी बिजल ठक्कर उपस्थित होत्या.

 

पार्किन्सन मध्ये कालांतराने वाढत जाणाऱ्या या विकारामध्ये मज्जासंस्था आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. याबाबतची लक्षणे वयोमानानुसार वाढत जातात,ज्यामध्ये मुख्यत्वे शरीरामध्ये कंप निर्माण होणे, हालचाल मंदावणे, शारीरिक संतुलन बिघडणे, चालताना तोल सांभाळता न येणे, शरीर घट्ट होणे (फ्रीझिंग),स्नायू कडक होणे,बोलण्यात बदल होणे इत्यादींचा समावेश असतो. हालचालींवर झालेला परिणाम आणि इतर लक्षणांमुळे रूग्णाच्या आत्मविश्वासावर प्रभाव पडतो आणि मानसिक व भावनिकदृष्ट्या प्रभाव पडू शकतो. अशा वेळी नियमित औषधोपचारांबरोबरच गरज भासते ती सपोर्ट ग्रुपची! हे सपोर्ट ग्रुप प्रोग्राम्स फक्त रूग्णांसाठीच नव्हे तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आहेत.

 

मेंदूविकारतज्ञ डॉ.धैर्यशील सस्ते म्हणाले की, पार्किन्सनमुळे आपल्या दैनंदिन क्रिया मंदावतात आणि काही वेळा यामुळे मनात चिंता निर्माण होते.परंतु भीती न बाळगता आपले दैनंदिन कामकाज आणि उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत.

 

केईएम हॉस्पिटलचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा म्हणाले की,हा पेशंट सपोर्ट ग्रुप रूग्णांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला आहे.या सर्वांचे व पार्किन्सन असलेल्या व्यक्तींची काळजी घेणाऱ्या सर्व लोकांचे कौतुक आहे.आव्हानांवर मात करत आपले दैनंदिन जीवन सामान्यपणे आपण कसे जगू शकतो हे पार्किन्सन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात लोकांच्या सकारात्मक उर्जेतून प्रवर्तित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुमिता देसाई व संपदा पाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.निकिता छाजेड

यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments