नवी दिल्ली | एप्रिल १५, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या (एचएमआयएल) सीएसआर विभागाने जागतिक कला दिनाचे औचित्य साधून आपल्या ‘ह्युंदाई आर्ट फॉर होप’ या फ्लॅगशिप कलाविषयक उपक्रमाच्या ५व्या सीझनची घोषणा केली आहे. सर्जनशील अभिव्यक्तीला वाट करून देणारा आणि समावेशक सांस्कृतिक वाढीची जोपासना करणारा हा उपक्रम २०२१ मध्ये सुरू करण्यात आला असून, तेव्हापासून तो उदयोन्मुख कलावंतांसाठी रूपांतरणात्मक व्यासपीठाचे काम करत आहे.
ह्युंदाई आर्ट फॉर होप- सीझन ५ साठी १ मे, २०२५ पासून अर्ज करता येतील. हे अर्ज hyundaiartforhope.com या अधिकृत वेबसाइटमार्फत पाठवायचे आहेत. एचएमआयएफ या नवीन पर्वात आर्थिक अनुदाने, तज्ज्ञांची मेंटॉरशिप तसेच त्यांची कला सर्वांपुढे मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ यांच्या माध्यमातून भारतभरातील ५० प्रतिभावंत कलावंतांना व कला समुदायांना सहाय्य करणार आहे.
एचएमआयएलचे एव्हीपी आणि कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सोशल विभागाचे व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद ‘आर्ट फॉर होप- सीझन ५’च्या सुरुवातीबद्दल म्हणाले, “सर्जनशीलतेची शक्ती साजरी करण्यासाठी जागतिक कला दिवसाहून अधिक चांगले औचित्य असू शकत नाही. ‘आर्ट फॉर होप’चा विकास केवळ कलावंतांना मदत करणारे व्यासपीठ म्हणून झालेला नाही, तर हा उपक्रम सामुदायिक उन्नती साध्य करतो आणि आपला सर्वांचा सांस्कृतिक वारसा जतन करतो. कलावंतांना प्रोत्साहन देण्याप्रती तसेच त्यांना त्यांच्या कलाप्रकारांमध्ये पारंगत होण्यात मदत करण्याप्रती मनापासून वाटणारी बांधिलकी आम्ही सीझन ५च्या माध्यमातून पुन्हा दृढ करत आहोत, त्यायोगे परिवर्तनाला प्रेरणा मिळू शकेल आणि भारताच्या चैतन्यपूर्ण आत्म्याचे प्रतिबिंब त्यात दिसेल.”
आर्थिक मदत पुरवण्याशिवाय हा उपक्रम कलावंतांना सामाजिक, भावनिक आणि व्यावसायिक मान्यता मिळवून देतो, त्यामुळे कलावंतांना दृश्यकला, लोककला, आदिवासीकला, सादरीकरणाच्या कला, डिजिटल कला आणि अशा विविध कलाप्रकारांमध्ये शाश्वत करिअर घडवण्यासाठी आवश्यक तो आधार मिळतो. गेल्या चार पर्वांमध्ये ‘आर्ट फॉर होप’ने १५०हून अधिक कलावंतांना १.६५ कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत केली आहे आणि २५,०००हून अधिक कलावंतांना कार्यशाळा, प्रदर्शने व कौशल्यबांधणी संधींच्या माध्यमातून सहाय्य केले आहे.
अनुदानाचे तपशील:
● व्यक्तिगत अनुदाने: व्यक्तींसाठी प्रत्येकी १ लाख रुपयांची ४० अनुदाने, यांमध्ये विकलांग कलावंतांचाही समावेश होतो
● संस्थात्मक अनुदाने: कला समुदाय व संस्थांना प्रत्येकी २ लाख रुपयांची १० अनुदाने
अर्जाचे प्रवर्ग:
● दृश्यकला: चित्रकला, रंगकाम, शिल्पकला आणि मिश्र माध्यमांचे सर्व प्रकार, यांमध्ये डिजिटल हस्तक्षेप झालेल्या कलांचा समावेश होत नाही
● डिजिटल कला: छायाचित्रण (फोटोग्राफी), न्यू मीडिया आर्ट, मल्टिमीडिया व तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात आलेली डिजिटल कला
● सादरीकरणाच्या कला: संगीत, हालचालींवर आधारित कला व अन्य सादरीकरण कलाप्रकार
● पारंपरिक कला व संस्कृती: भारतातील लोककला व हस्तकला, यांमध्ये लोकसंगीतात काम करणारे कलावंत, कला सादर करणारे कलावंत आणि संशोधन/कलावंत सक्षमीकरण कार्यक्रमांचा समावेश होतो
● कार्यात्मक नवोन्मेष्कारी कला व हस्तकला: हस्तकलेचा उपयोग करून शाश्वत, पर्यावरणपूरक किंवा उपयुक्ततावादी प्रकल्पांवर भर देणारे प्रकल्प
● मल्टिडिसिप्लिनरी आर्ट (बहुशाखीय कला): एका प्रकल्पावर काम करणाऱ्या कलेच्या विविध शाखांतील कलावंतांमधील सहयोग
कलाकार पुढील वेबसाइटमार्फत अर्ज करून त्यांच्या प्रकल्पांची नामांकने सादर करू शकतात-hyundaiartforhope.com. या उपक्रमाबद्दलचे महत्त्वाचे तपशीलही या वेबसाइटवरच उपलब्ध आहेत. या उपक्रमाविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी कलाकार पुढील ईमेल आयडीवर संपर्क करू शकतात- contactus@hyundaiartforhope.com


