Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी - विवेक मिश्रा: एमआयटी डब्लूपीयु मध्ये बायोकॉन्क्लेव्ह...

नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी – विवेक मिश्रा: एमआयटी डब्लूपीयु मध्ये बायोकॉन्क्लेव्ह २०२५ संपन्न

 

आजचे युग हे नवकल्पनांचे असून, जैव अभियांत्रिकीला उज्वल भविष्य आहे, पण नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी असा सल्ला बंगलोर येथील फॅब्रोहिल वाऊन्डकेअर चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मिश्रा यांनी बायोकॉन्क्लेव्ह २०२५ च्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या बायोइंजिनिअरिंग विभागाअंतर्गत दिनांक २१ एप्रिल रोजी बायोकॉन्क्लेव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले. फॅब्रोहिल वाऊन्डकेअर हे रेशीम कृमीपासून विकसित केलेल्या जैवसामग्रीवर आधारित उपचारपद्धतीवर काम करते, उपचार हेच नवीन अभियांत्रिकी आहे असा संदेश विवेक मिश्रा यांनी दिला. उदघाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला, आयोजन सचिन तथा सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विक्रांत गायकवाड यांनी बायोकॉन्क्लेव्ह २०२५ च्या मागची भूमिका मांडली तर अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संकुलाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी स्वागतपर भाषण केले. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी जैव अभियांत्रिकी उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन जगतातील उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभ्यासक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर, अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, कुलसचिव श्री. गणेश पोकळे, केमिकल – बायो इंजिनीअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. दिनेश भुतडा आणि कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. शर्बानी कौशिक उपस्थित होत्या. सहसंयोजनाची जबाबदारी डॉ. श्रद्धा कुलकर्णी व डॉ. शुभांगी रस्तोगी यांनी पार पाडली. दुसऱ्या सत्रात दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात उद्योग, संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले. पहिल्या परिसंवादात डॉ. परवीन गोयल (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, गौरव त्रिपाठी (इनोप्लेक्सस), सारंग साळुंके (थ्री एस ऍनालीटीकल ) व डॉ. कविता मोदी-परिख (व्हेंचर सेंटर ) यांचा सहभाग होता. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैद्यकीय संशोधन, परवडणाऱ्या डायग्नॉस्टिक तंत्रज्ञानाची आवश्यकता, व शिक्षण-संशोधन-उद्योग या त्रिसूत्रीला जोडणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणावर भर दिला. गौरव त्रिपाठी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता – सिम्युलेटर आणि टीकाकार ही संकल्पना मांडली, तर सारंग साळुंके यांनी ग्रामीण आरोग्याच्या संदर्भात ‘सुलभता ही सर्वात मोठी प्राधान्य आहे’ असे ठासून सांगितले. परिसंवादाचे संचलन डॉ. शर्बानी कौशिक यांनी केले.

दुसऱ्या परिसंवादात डॉ. रमेश भोंडे (डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज, पुणे), डॉ. प्रणव क्षिरसागर (आगरकर रिसर्च इन्स्टिटयूट, पुणे), डॉ. सुजोय साहा (द्राक्ष संशोधन केंद्र), व श्री. अक्षय झंवर (जीन स्पेक्ट्रम) यांनी आधुनिक वैद्यकीय संशोधनातील दिशा मांडल्या. स्टेम सेल थेरपीचे फायदे व मर्यादा, क्लिनिकल जेनोमिक्सचा वापर, टेक्नो-इकॉनॉमिक विश्लेषण यावर मोलाचे विचार मांडले गेले. वेदना प्रणित निदान यासारख्या कल्पनांनी विद्यार्थ्यांना नवसंशोधनासाठी प्रेरणा दिली. चर्चा सत्राचे मुख्य सूत्र होते: “कठीण गोष्टी साधेपणाने समजून घ्या आणि अंमलात आणा. परिसंवादाचे संचलन डॉ. मनीषा शाजी यांनी केले. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित भित्तीचित्र स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तथा गेट परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हि करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात विद्यापीठाने तीन ठोस उपक्रम जाहीर केले. विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप व इंटर्नशिपसाठी निधी पुरवठा, प्राध्यापक आणि उद्योग जगात यांचे संयुक्त विद्यमाने संशोधन लेख प्रकाशित करणे आणि शस्त्र – शास्त्र उपदेशन, ज्या अंतर्गत पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधला जाईल. चरक संहितेतील उद्धरणाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि सहभागी सर्वांना उद्याच्या आरोग्यसेवेसाठी नव्याने घडवण्याचे आव्हान देण्यात आले. बायोकॉन्क्लेव्ह २०२५ च्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अंकिता अगरवाल, डॉ. हिमांगी नेवे, डॉ. सागर काणेकर यांनी परिश्रम घेतले. संशोधन, उद्योग, आणि धोरणनिर्माते यांना एकत्र आणणारे हे शिखरसंमेलन जैवतंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरले असे विधान बायोकॉन्क्लेव्ह २०२५ चे मुख्य समन्वयक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments