Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorized56 दिवस एनआयसीयूमध्ये झुंज देणाऱ्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला नवजीवन

56 दिवस एनआयसीयूमध्ये झुंज देणाऱ्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला नवजीवन

पुणे,5 मे 2025 : मुदतपूर्व जन्मलेल्या व अँटीनेटल डॉपलर चेंजेस ही गंभीर परिस्थिती असलेल्या बाळाने तब्बल 56 दिवस एनआयसीयूमध्ये झुंज देत सर्व आव्हानांवर मात केली. नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांच्या तज्ञ टीममध्ये नोबल हॉस्पिटल्समधील एनआयसीयू विभागाचे ॲकेडेमिक प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ.अनिल खामकर, वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ.महेश शिंदे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.अमित शहा, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या एनआयसीयू विभागाचे संचालक डॉ.अभय महिंद्रे आणि एनआयसीयू विभागातील कर्मचाऱ्यांनी बाळावर केलेले उपचार आणि घेतलेली परिपूर्ण काळजी या दृष्टीने महत्त्वाची ठरली. आता हे बाळ अधिक सुदृढ होऊन आपल्या घरी गेले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नोबल हॉस्पिटल्समधील एनआयसीयू विभागाचे ॲकेडेमिक प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ.अनिल खामकर म्हणाले की, 31 आठवडे (7.5 महिने) मुदतपूर्व जन्मलेल्या 1.1 किलो इतके खूपच कमी वजन असलेल्या बाळाला आमच्या एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अँटीनेटल डॉपलर चेंजेस (आईकडून बाळाला होणाऱ्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा) ची समस्या हे मुदतपूर्व प्रसूतीचे कारण होते. अशा वेळी रक्त पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अशा स्थितीत बाळाच्या आतड्यांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे बाळाला दूध पचविण्यास त्रास होत होता आणि फुफ्फुसांची अपूरी वाढ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) अशा इतर गुंतागुंती देखील निर्माण झाल्या होत्या.

म्हणून बाळाला व्हेंटिलेटरचा आधार देण्यात आला आणि फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करणारा महत्त्वाचा पदार्थ असलेले सर्फेक्टंट देखील देण्यात आले.

डॉ.खामकर म्हणाले की,अशा स्थितीत काही ना काही विकृती किंवा आजार असण्याची शक्यता असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूदर हा 50 टक्के असतो,म्हणूनच ही स्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते. योग्य नियोजनाद्वारे पहिल्या सात दिवसात इनव्हेसिव्ह व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आणि नंतर नॉन-इनव्हेसिव्ह सपोर्टवर बाळाला ठेवण्यात आले. यामुळे बाळाच्या जगण्याच्या शक्यतांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल अशी आशा निर्माण झाली. एनआयसीयूमध्ये वास्तव्य असताना बाळाला कुठलाही संसर्ग होऊ नये यासाठी कठोर प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आले.

डॉ.महेश शिंदे म्हणाले की, यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे योग्य पोषण देणे हे होते. जेव्हा बाळ दूध पचवण्याच्या स्थितीत नव्हते,तेव्हा त्याला टोटल पॅरेंटल न्युट्रिशन (टीपीएन) देण्यात आले, ही आहार देण्याची एक पध्दत असून यामध्ये रक्तवाहिनीद्वारे थेट रक्तप्रवाहात पोषक तत्वे पोहचविले जातात. यामुळे बाळाला डिस्चार्ज देताना त्याचे वजन 1.8 किलो पर्यंत वाढण्यास मदत झाली.

डॉ.खामकर म्हणाले की, बाळ बरे झाल्यानंतर आता किमान दोन वर्षे सर्वसमावेशक पाठपुरावा करणे आवश्यक आहे. बाळाच्या वाढीबरोबरच विकासावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे.याचे कारण, डॉपलर चेंजेससारख्या स्थितीमुळे बाळामध्ये विकासात्मक समस्या आणि सेरेब्रल पाल्सी (सीपी) किंवा पेरिव्हेंट्रिक्युलर ल्युकोमॅलेशिया सारखे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण चांगली गोष्ट अशी की, आमच्या सध्याच्या वैद्यकीय तपासणीमध्ये बाळ हे सक्रीय व सुदृढ असून त्याची स्थिती सामान्य आहे असे दिसून आले आहे.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, हे बाळ अधिक सुदृढ होऊन घरी जाणे ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. हे यश आमच्या बहुशाखीय टीमचे सांघिक कार्य,सुरक्षितता आणि देखभालीचे सर्वोच्च मानकांचे पालन करत आरोग्य सेवा प्रदान करण्याची कटिबद्धता दर्शविते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments