पुणे, 9 सप्टेंबर 2026 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमने सिएरा लिओन येथील सेप्टिक हिपच्या समस्येने त्रस्त असलेल्या 22 वर्षीय तरुणावर रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. या शस्त्रक्रियेमुळे तरुणाची असह्य वेदनांपासून मुक्तता झाली असून, त्याला पुन्हा हालचाल करणे शक्य झाले आहे.
या तरुणावर यापूर्वी दुसऱ्या रुग्णालयात सेप्टिक हिपसाठी प्राथमिक हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच कंबरेच्या सांध्यामध्ये पुन्हा संसर्ग झाला. त्यानंतर एक वर्षाने तो उपचारासाठी भारतात आला. तोपर्यंत संसर्ग अधिक पसरला होता.
याविषयी अधिक माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील ऑर्थोसर्जन डॉ.मुर्तझा अदीब, एफआरसीएस ईडी (ऑर्थ) म्हणाले की, हा तरुण आमच्याकडे आला तेव्हा त्याला अत्यंत तीव्र वेदना होत होत्या आणि पूर्णपणे हालचाल करता येत नव्हती. या स्थितीचे अचूक निदान करण्यासाठी एक्स-रे, एमआरआय आणि विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या.
हिप रिप्लेसमेंटनंतर निर्माण होणारा सेप्टिक हिप याला प्रोस्थेटिक जॉईंट इन्फेक्शन असेही म्हटले जाते.हा कृत्रिम सांध्याभोवती होणारा गंभीर जंतूसंसर्ग असून,त्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार आणि सामान्यत: रिव्हिजन शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.
डॉ.अदीब पुढे म्हणाले की,रिव्हीजन हिप रिप्लेसमेंट ही दोन टप्प्यांत केली जाणारी प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात संसर्ग दूर करणे हे असते.यासाठी सुरूवातीच्या टप्प्यात कप आणि स्टेम यांसह सर्व धातूचे घटक काढून टाकले जातात.त्यानंतर ती जागा खराब झालेल्या पेशी काढून साफ केली जाते. या प्राथमिक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात सांध्याच्या मोकळ्या जागेत सिमेंट स्पेसर हे उपकरण बसविले जाते.याशिवाय या प्रक्रियेमध्ये संसर्ग झालेल्या पेशी आणि पू चे नमुने जंतूसंसर्गाच्या निदानासाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले.
प्राथमिक शस्त्रक्रियेनंतर संसर्ग दूर करण्यासाठी अँटीबायोटिक्स सुरू करण्यात आले आणि सुमारे 8 आठवडे वाट पाहिली गेली.संसर्ग पूर्ण बरा झाल्यावर रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली.
दुसरी शस्त्रक्रिया ही अधिक जटिल होती.संसर्गामुळे झालेली हाडांची झीज आणि मांडीच्या हाडांच्या विकृतीमुळे ही स्थिती अधिक गुंतागुंतीची होती.आम्हाला ॲसिताबुलम (कंबरेच्या हाडात बसवायचे कपच्या आकाराचे उपकरण) अतिशय काळजीपूर्वक तयार करावे लागले आणि बोन ऑगमेंटस (अत्यंत सछिद्र धातूंचे तुकडे) आणि एक विशेष रिव्हिजन कपचा वापर करण्यात आला.त्यानंतर मांडीचे हाड कापावे लागले.या प्रक्रियेला फेमोरल ऑस्टियोटोमी असे म्हणतात.या प्रक्रियेत मांडीचे हाड कापून त्याला पुन्हा आकार देऊन वजन पेलण्याचे सामान्य अक्ष पुर्ववत करण्यासाठी आणि सांध्यांवरील ताण कमी करण्यासाठी योग्य स्थितीत स्थिर केले गेले.त्यानंतर मांडीच्या हाडामध्ये एक भारवाहक कृत्रिम अवयव (फेमोरल स्टेम) बसवण्यात आले.यामुळे हिप रिप्लेसमेंट अधिक स्थिर झाली.
दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. रुग्णाला 5 जून 2026 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिली शस्त्रक्रिया 8 जून 2026 रोजी करण्यात आली, तर रिव्हिजन हिप रिप्लेसमेंटची दुसरी शस्त्रक्रिया 22 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. सध्या रुग्ण संसर्गमुक्त असून, आणखी सुमारे सहा आठवड्यांत तो सामान्यपणे चालू शकेल, अशी अपेक्षा आहे.
या शस्त्रक्रियेत डॉ. मुर्तझा अदीब यांच्यासह संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ.अमित द्रविड,इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अपर्णा कोद्रे,भूलतज्ञ डॉ.संगीता चंद्रशेखर तसेच ऑर्थोपेडिक असिस्टंट्स डॉ. प्रशांत आणि भालचंद्र पाटील,फिजिओथेरपिस्ट डॉ.अजय सोनावले यांचा सहभाग होता.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले की, आफ्रिकेच्या सिएरा लिओन मधील रुग्णावर रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे ही आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे. या वैद्यकीय कामगिरीतून पुण्यातील अत्याधुनिक आरोग्यसेवा क्षमतेवर आंतरराष्ट्रीय रुग्णांचा वाढता विश्वास अधोरेखित होतो. विशेषतः आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील रुग्णांसाठी विशेष आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पुणे हे एक पसंतीचे ठिकाण म्हणून वेगाने पुढे येत आहे. कुशल तज्ज्ञ, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वसमावेशक आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि किफायतशीर उपचार पर्याय यामुळे पुणे हे आशियातील प्रमुख मेडिकल टुरिझम हब म्हणून आपले स्थान अधि
क मजबूत करू शकते.


