लातूर, दि.८ मे: ” लोभापासून दूर राहणे हे मनुष्याच्या जीवनात खूप महत्वाचे आहे. लोभामुळे व्यक्ती दुःखी होतो. त्याच्या विचारात नकारात्मकता येते आणि तो चांगल्या कामापासून दूर राहतो. अशावेळी संत विचारच मानवाला लोभ मुक्त करतात. यासाठी संतांनी दाखविलेल्या मार्गाचे सर्वांनी अनुकरण करावे.” असे अनमोल विचार ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व समस्त गावकरी मंडळ, रामेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकोबारायांचे जीवन चरित्र कथेचे आयोजन विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. तसेच त्यांनी काल्याचे किर्तन ही केले.
यावेळी जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, कमल राजेखाँ, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे व राजेश कराड हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते व रामेश्वरच्या पंचक्रोशितील भाविक उपस्थित होते.
ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर म्हणाले,” लोभ हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असल्याने यापासून शक्य तितके दूर रहावे. लोभामुळेच जगामध्ये अशांततता पसरलेली आहे. अशावेळेस विश्वशांतीसाठी प्रा.डॉ .विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती ज्ञान ज्योती पेटविली आहे. ही ज्ञान ज्योत विश्व मानवता आणि बंधुत्वाचा विचार संयुक्त राष्ट्र संघापर्यंत पोहचवून संपूर्ण जगाला सांगणार आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” रामेश्वर (रुई) चे नाव संपूर्ण जगभरात मानवतेचा व विश्वशांतीचा संदेश देणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले पाहिजे. सर्व धर्म ग्रंथ हे खरे जीवनग्रंथ आहेत. कसे जगावे आणि कसे जगू नये याची शिकवण आपल्याला देत आहेत.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी आनंदात जीवन जगण्याचा मंत्र दिला.
रामेश्वर येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकोबारायांचे जीवन चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रामेश्वरच्या पंचक्रोशितील भाविक भक्त आणि माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सात दिवस चाललेल्या सप्ताहाची सांगता गावात सकाळी दिंडी काढून मोठ्या उत्साहात करण्यात आली.
संपूर्ण सप्ताहात हभप बाबा महाराज बोराडे, हभप भगवान महाराज कराड, हभप महादेव महाराज बोराडे, हभप उद्धव महाराज, हभप आप्पा महाराज चौरे, हभप प्रभाकरनाना महाराज व हभप बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांनी श्री संत तुकोबारायांचे जीवन चरित्रावर विचार मांडले.
हरिनाम सप्ताह यशस्वीतेसाठी राजेश कराड व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.
संत विचारच मानवाला लोभ मुक्त करतील ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांचे विचारः मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
RELATED ARTICLES


