Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedगंभीर किडनी विकाराशी झुंजणाऱ्या जबलपूरच्या जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ला पुण्यात मिळाले जीवदान

गंभीर किडनी विकाराशी झुंजणाऱ्या जबलपूरच्या जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ला पुण्यात मिळाले जीवदान

पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांनी हेमोडायलिसिसचा सल्ला दिलेल्या ७ वर्षीय रोव्हरच्या किडनीतील खडे अत्याधुनिक RIRS पद्धतीने केले दूर

 

पुणे, सप्टेंबर २०२६: गंभीर किडनी विकाराने त्रस्त असलेल्या जबलपूरच्या सात वर्षीय जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ला पुण्यात अत्याधुनिक उपचारांमुळे नवे जीवन मिळाले आहे. किडनी निकामी होण्याच्या गंभीर अवस्थेमुळे रोव्हरला हेमोडायलिसिससाठी पुण्यात पाठविण्यात आले होते. मात्र, पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांनी केलेल्या सखोल तपासणीत त्याच्या किडनी आणि मूत्राशयात खडे असल्याचे आढळून आले. हे खडे त्याच्या किडनीची कार्यक्षमता खालावण्यामागील एक प्रमुख कारण होते. त्यानंतर डॉ. परदेशी आणि त्यांच्या टीमने Retrograde Intrarenal Surgery (RIRS) या अत्याधुनिक आणि कमीत कमी चिरफाड असलेल्या पद्धतीने खड्यांवर यशस्वी उपचार केले. कुत्र्यावर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण उपचारांपैकी ही एक प्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

रोव्हर पुण्यात आला तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे तातडीने हेमोडायलिसिस करण्याऐवजी त्याच्या किडनीची कार्यक्षमता का खालावत आहे, याचे नेमके कारण शोधण्याचा निर्णय डॉ. परदेशी आणि त्यांच्या टीमने घेतला. विविध तपासण्यांमध्ये त्याच्या किडनी आणि मूत्राशयात खडे असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला औषधोपचार आणि आवश्यक उपचारांद्वारे रोव्हरची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर RIRS करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

कुत्र्यांमध्ये मूत्रमार्गात किंवा मूत्राशयात खडे होण्याची समस्या आढळते. वैद्यकीय भाषेत याला ‘युरोलिथियासिस’ (Urolithiasis) असे म्हटले जाते. हे खडे मूत्राशय, मूत्रमार्ग किंवा किडनीमध्ये तयार होऊ शकतात. किडनीतील खड्यांमुळे लघवीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास किंवा किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. रोव्हरच्या बाबतीत तो पुण्यात येईपर्यंत किडनीची कार्यक्षमता आधीच मोठ्या प्रमाणावर खालावली होती.

 

नेमकी RIRS प्रक्रिया काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, RIRS मध्ये शरीरावर मोठा छेद न घेता नैसर्गिक मूत्रमार्गातून अतिशय बारीक आणि लवचिक दुर्बिण किडनीपर्यंत नेली जाते. या दुर्बिणीला असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने किडनीतील खडा शोधला जातो. त्यानंतर अत्यंत सूक्ष्म लेझर फायबरच्या मदतीने खड्याचे बारीक तुकडे किंवा भुकटी केली जाते. त्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेप्रमाणे मोठी चिरफाड करण्याची आवश्यकता राहत नाही.

 

रोव्हरच्या उपचारांतील आव्हानांविषयी पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, “रोव्हर आमच्याकडे आला तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्याला हेमोडायलिसिससाठी पाठविण्यात आले होते. त्याचे क्रिएटिनिन १३.७९ आणि युरिया १२३.९ पर्यंत वाढले होते. सखोल तपासणीनंतर त्याच्या किडनीसोबतच मूत्राशयातही खडे असल्याचे आढळले. हे खडे त्याच्या किडनीच्या बिघडलेल्या कार्यक्षमतेमागील एक महत्त्वाचे कारण होते.”

“रोव्हरची प्रकृती इतकी गंभीर होती की त्याच्यावर लगेच कोणतीही प्रक्रिया करणे जोखमीचे होते. त्यामुळे सर्वप्रथम त्याची प्रकृती स्थिर करणे हे आमच्यासमोरील मोठे आव्हान होते. रक्त तपासणी, एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी आणि आवश्यक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर आम्ही RIRS करण्याचा निर्णय घेतला. कुत्र्याच्या शरीराची रचना आणि मूत्रमार्ग अतिशय लहान असल्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. किडनीपर्यंत पोहोचून खड्यांचे सुरक्षितपणे तुकडे करण्यासाठी अत्यंत अचूकता आवश्यक होती,” असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

 

उपचारानंतर रोव्हरच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. उपचारापूर्वी १३.७९ असलेले क्रिएटिनिन २.० पर्यंत, तर १२३.९ असलेले युरिया २२.९ पर्यंत खाली आले. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर रोव्हरला ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो आपल्या कुटुंबासोबत जबलपूरला परतला.

रोव्हरच्या कुटुंबासाठी हा संपूर्ण प्रवास अत्यंत भावनिक होता.

 

रोव्हरची पालक सेजल कुशवाहा म्हणाली, “रोव्हर गेल्या सात वर्षांपासून आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्याची प्रकृती बिघडत गेली आणि किडनी निकामी होत असल्यामुळे डायलिसिस करावे लागू शकते असे आम्हाला सांगण्यात आले, तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. त्याच्यासाठी शक्य असलेला प्रत्येक उपचार करून पाहायचा होता, म्हणून आम्ही त्याला जबलपूरहून पुण्यात घेऊन आलो.”

 

“डॉ. नरेंद्र परदेशी यांनी रोव्हरची परिस्थिती आणि त्याच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांविषयी आम्हाला अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले. या कठीण काळात त्यांनी आम्हाला विश्वास दिला. उपचारांना रोव्हरने चांगला प्रतिसाद दिला आणि त्याला पुन्हा चांगल्या अवस्थेत घरी घेऊन जाता आले, हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोठा दिलासा होता. डॉ. परदेशी आणि पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकच्या संपूर्ण टीमचे आम्ही मनापासून आभारी आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

डॉ. परदेशी यांच्या मते, पशुवैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे पाळीव प्राण्यांवरील गुंतागुंतीच्या आजारांसाठीही अत्याधुनिक आणि कमीत कमी चिरफाड असलेल्या उपचारपद्धती उपलब्ध होत आहेत.

 

“मानवी वैद्यकीय क्षेत्रात किडनीतील खड्यांवर उपचार करण्यासाठी RIRS पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, प्राण्यांमध्ये अशी प्रक्रिया करण्यासाठी विशेष कौशल्य, अत्याधुनिक उपकरणे आणि योग्य रुग्ण निवड अत्यंत महत्त्वाची असते. कमीत कमी चिरफाड असलेल्या उपचारपद्धतीमुळे मोठ्या शस्त्रक्रियेमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. परदेशी यांनी सांगितले

 

“आज पाळीव प्राणी हे कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकमध्ये योग्य रुग्णांसाठी आधुनिक आणि प्रगत पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत आमच्याकडे आलेला रोव्हर उपचारानंतर पुन्हा आपल्या कुटुंबासोबत जबलपूरला परतला, ही आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत समाधानाची बाब आहे,” असे डॉ. परदेशी यांनी नमूद केले.

 

रोव्हर आता आपल्या कुटुंबासोबत जबलपूरमध्ये असून, त्याच्या किडनीची कार्यक्षमता आणि एकूण प्रकृतीवर पुढील काळात नियमित वैद्यकीय देखरेख ठेवली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments