Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाध्यम गोंधळ: संनियंत्रण आवश्यक

माध्यम गोंधळ: संनियंत्रण आवश्यक

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी
कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला
करून २६ पर्यटकांचे त्यांच्या
कुटुंबियांसमोर जीव घेतले.या भेकड हल्ल्याचा पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे नेम धरून ९ तळ उध्वस्त करून भारताने योग्य तो बदला घेतलाच पण पुढे असे हल्ले होणार नाही,याची तजवीज केली. ही कारवाई करीत असताना,पाकिस्तान च्या लष्कराचे आणि महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमधील आम
नागरिकांची जीवित व वित्त हानी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता भारतीय लष्कर आणि हवाई दलाने घेतली आहे.या सर्व कारवाईबाबत केवळ देशातील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला योग्य माहिती मिळावी म्हणून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे.

खरं म्हणजे,आजच्या या सर्व संवेदनशील,गंभीर पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांनी विशेषतः वृत्त वाहिन्या आणि समाज माध्यमांनी अतिशय जबाबदारीने आपली भूमिका पार पाडण्याची नितांत गरज आहे.विश्वासार्हता हा कुठल्याही माध्यमाचा आत्मा असतो.पण काही वृत्त वाहिन्या आणि समाज माध्यमांनी जणू आपली
विश्वासार्हता असली काय आणि नसली काय? अशी अत्यंत बेजबाबदार पणाची भूमिका घेऊन माध्यमांच्या मूलभूत तत्वांनाच गुंडाळून ठेवले आहे. या आपल्या
बेजबाबदार बातमीदारीमुळे,
खरं म्हणजे याला
बातमीदारी म्हणणे सुद्धा चूकच आहे, नागरिकांमध्ये किती अस्वस्थतेचे,सुरक्षिततेचे
वातावरण निर्माण होऊन,त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर,मानसिक,भावनिक,आर्थिक बाबींवर परिणाम होत असेल,याचा जराही विचार काही बेजबदार वाहिन्या आणि समाज माध्यमे करताना दिसत नाहीय ही केवळ शरमेची बाब नाहीय तर या त्यांच्या वागण्याची सरकारने,संबंधित यंत्रणांनी गंभीरपणे दखल घेऊन तत्काळ योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.

या बाबतीत , चुकीच्या बातम्यांचे (फेकन्युज) खंडन करण्यासाठी भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे.पण अफवा पसरण्याचा वेग हा सत्य पसरण्यापेक्षा हजारपटीने अधिक असतो,त्यात आजच्या अत्याधुनिक माध्यम तंत्रज्ञानामुळे त्याला एका क्षणाचा सुद्धा वेळ लागत नाही,ही वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रसारित झालेल्या बातम्यांची शहानिशा करून या बातम्या खोट्या आहेत, हे
पत्र सूचना कार्यालयाने सांगे पर्यंत महत्वाची वेळ निघून गेलेली असते आणि व्हायची ती हानी होऊन गेलेली असते.

ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मला एक जो उपाय सुचतो तो म्हणजे सार्वत्रिक निवडणूक कालावधीत , भारत निवडणूक आयोग ज्या पद्धतीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यम संनियंत्रण समित्या नेमते ,त्या धर्तीवर भारत सरकार ने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यम संनियंत्रण समित्या स्थापन करून चुकीच्या, खोट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या,वृत्तांत,मुलाखती, चर्चा आयोजित करून प्रसारित करीत आहेत,त्यांची नोंद घेऊन अशा वाहिन्या , समाजमाध्यमे, व्यक्ती आणि अन्य जी काही व्यासपीठे असतील त्यांच्यावर तत्काळ बंदी घातली पाहिजे. माध्यमातील काही जणांच्या अशा बेजबाबदार, अविवेकी
वागणुकीमुळे केवळ देशांतर्गत दुष्परिणाम होत नसून जगात भारताचे,भारतीय माध्यमांचे किती हसे होत असेल, देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या येण्यावर, देशाबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांवर ,परदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय नागरिकांच्या मनस्थितीवर काय परिणाम झाला आहे, होत आहे याची किंचितशी देखील तमा न बाळगणाऱ्या ,आपल्या व्यावसायिक उत्तरदायित्वाची जाणीव नसलेल्या माध्यम संस्था आणि व्यक्ती यांची माध्यमात काम करण्याची लायकी नाही हे जाणून घेऊन त्यांच्यावर कायमची बंदी घालणं ही आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

मला आशा आहे की,माझे उपरोक्त विचार वाचून यथायोग्य जनजागरण होऊन,
ते भारत सरकार आणि सर्व राज्य सरकारे,प्रसार माध्यमे यांच्या पर्यंत पोहोचून , सध्या सुरू असलेल्या माध्यम गोंधळाला पायबंद बसेल.
जयहिंद.
लेखन: देवेंद्र भुजबळ
९८६९४८४८००.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments