Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंचांगकर्ते मोहन दाते यांना यंदाचा ब्राह्मण भूषण पुरस्कार* "ब्राह्मण रत्ने" चरित्रकोश...

पंचांगकर्ते मोहन दाते यांना यंदाचा ब्राह्मण भूषण पुरस्कार* “ब्राह्मण रत्ने” चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशनही होणार!

पुणे, दि. 21 मे – “आम्ही सारे ब्राह्मण” या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‌‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते यांना येत्या रविवारी (25 मे) प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे व माधुरी कुलकर्णी यांनी आज येथे दिली. तसेच गेल्या 225 वर्षातील विविध क्षेत्रातील राष्ट्रकार्यासाठी समर्पित कर्तृत्ववान महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या ‌‘ब्राह्मण रत्ने’ या चरित्रकोश ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे दोन खंडात प्रकाशन होणार असून वंदना धर्माधिकारी लिखित यशोगाथा-ब्राह्मण स्त्रियांच्या या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात येणार आहे.
येत्या रविवारी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे होणाऱ्या या समारंभामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी, उद्योजक हृषिकेश कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर राहणार आहेत. ब्राह्मण भूषण पुरस्कायाबरोबरच यंदाचा “इंदुमती-वसंत करिअर भूषण” पुरस्कार युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना, “डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार” पुरस्कार युवा कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. सौ. किरण कुलकर्णी यांना तर ब्राह्मण समाजासाठी गेली 98 वर्षे काम करणाऱ्या श्री शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा, पुणे (याज्ञवल्क्य आश्रम) या संस्थेला ‌”भगवान परशुराम ब्राह्मण संस्था” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 12 वे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी, रोख रक्कम आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराबाबतची अधिक माहिती देतांना कुलकर्णी म्हणाले की, महाराष्ट्रात दाते पंचांगाला 110 वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पंचांगाचा संबंध थेट खगोलशास्त्राशी असून याचा सर्व प्रकारच्या नियोजनांमध्ये प्रभावी उपयोग केला जातो. ही परंपरा यशस्वीपणे चालवणारे मोहन दाते यांना यंदाच्या ‌”ब्राह्मण भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दररोज सुमारे 50 हजारांहून अधिक पोळ्यांची निर्मिती करणारा युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी हा पुरस्कार सुरु केला आहे.
यावेळी संस्थेबाबतची माहिती देतांना ओर्पे म्हणाले की, आम्ही सारे ब्राह्मण या संस्थेच्या वतीने ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक गेली 20 वर्षे प्रसिध्द करण्यात येत आहे. या मासिकाच्या माध्यमातून ब्राह्मण संस्था, संघटनांचे एकत्रिकरण करण्यात येते त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात येतो. ब्राह्मण तरुणांची उद्योजकीय मानसिकता तयार करणे, नवउद्योजक निर्माण करणे तसेच ब्राह्मण उद्योजकांना सर्व प्रकारची मदत पुरवणे हे देखील कार्य आमच्या संस्थेतर्फे केले जाते.
यापूर्वी ब्राह्मण भूषण पुरस्काराने सर्वश्री अपर्णा रामतीर्थकर, अ.भा. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक गोविंद कुलकर्णी एअरमार्शल भूषण गोखले, शारदा पीठमचे पं. वसंतराव गाडगीळ, पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, श्री सद्गुरू ग्रुपचे यशवंत कुलकर्णी, प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, पत्रकार सुशील कुलकर्णी यांना गौरविण्यात आले आहे. तसेच यापूर्वी ‌‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग गोसावी, लेखक घन:श्याम पाटील, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, पत्रकार डॉ. सागर देशपांडे, योगगुरू सौ. मनाली देव यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार सौ. मानसी बडवे, सौ. संज्योत केतकर यांना प्रदान करण्यात आला आहे. तर भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था यांना प्रदान करण्यात आला होता.
——————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments