*
पुणे : मुलांना वाचनाची गोडी लावणाऱ्या आणि त्यांचं कल्पनाविश्व फुलवणाऱ्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’ला आजपासून (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे भव्य प्रारंभ होणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या जत्रेचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर, खडकी शिक्षण संस्था आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, चित्रकार-प्रकाशक ल. म. कडू आणि बाल साहित्यकार राजीव तांबे हे उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही जत्रा २५ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे. बालसाहित्य, गोष्टी, विज्ञानप्रयोग, जादूचे प्रयोग, पपेट शो, लेखकांशी गप्पा, कथालेखन कार्यशाळा, जुने पारंपरिक खेळ अशा असंख्य नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल येथे पाहायला मिळणार आहे.
या जत्रेत ‘आपले अंगण’ उपक्रमांतर्गत मुलांना विटी-दांडू, भातुकली, भोवरा अशा पारंपरिक खेळांचा अनुभव घेता येणार आहे, तर खाऊगल्लीत चमचमीत पदार्थांची चवही चाखता येईल. मुलांसोबत पालक आणि शिक्षकांसाठीही विशेष परिसंवाद आणि सत्र आयोजित करण्यात आली आहेत.
ही केवळ पुस्तकांची नव्हे, तर कल्पकता, सर्जनशीलता आणि आनंदाने भरलेली एक जत्रा आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या बाळगोपाळांसह या आनंददायी जत्रेत आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
…
*
…


