Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महापालिका 'नवी दिशा' सामुदायिक शौचालय उपक्रमाचे होणार कार्यपद्धती मूल्यांकन महिला...

पिंपरी चिंचवड महापालिका ‘नवी दिशा’ सामुदायिक शौचालय उपक्रमाचे होणार कार्यपद्धती मूल्यांकन महिला बचतगटांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे उपक्रम

पिंपरी, ६ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामाजिक विकास विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नवी दिशा’ सामुदायिक शौचालय उपक्रमाचे कार्यपद्धती मूल्यांकन (परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून शौचालये चालवण्याच्या या अभिनव मॉडेलने महिलांसाठी रोजगार व नेतृत्वाची संधी निर्माण केली आहे.
सध्या शहरातील ६० हून अधिक सामुदायिक शौचालये ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत कार्यरत असून, या शौचालयांचे मूल्यांकन स्वच्छता, देखभाल, नागरिकांच्या समस्येचे निराकरण व सामुदायिक सहभाग, अशा विविध निकषांवर आधारित असणार आहे. या प्रक्रियेद्वारे महिला बचतगटांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करून त्यांची क्षेत्रेही निश्चित केली जातील.
मूल्यांकनाचा मुख्य उद्देश
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला गटांना सन्मानित करणे, चांगल्या कामाचे मॉडेल इतर ठिकाणी राबवणे, व्यवस्थापन सुधारण्यासाठी अभिप्राय पद्धती (फीडबॅक लूप) तयार करणे, असा उद्देश शौचालय उपक्रमाचे कार्यपद्धती मूल्यांकन करण्याचा आहे.
कोट
पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ राहून महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे शहराच्या स्वच्छतेसाठी पाऊल पुढे टाकत आहे. ‘नवी दिशा’ उपक्रम हा महिलांच्या नेतृत्वातून शाश्वत शहरी सेवेचे व्यवस्थापनाचा आदर्श आहे. या मूल्यांकनाच्या माध्यमातून यशस्वी पद्धतींचा प्रसार होईल आणि उपक्रमाच्या दर्जात सातत्याने सुधारणा होऊन स्वच्छतेविषयक सेवा अधिक परिपूर्ण होतील.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कोट
सार्वजनिक शौचालय सेवेच्या मूल्यांकनातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग ‘नवी दिशा’च्या पुढील टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी व नाविन्यपूर्ण उपाययोजनांसाठी केला जाईल. या मूल्यांकनामुळे स्वच्छता सेवा अधिक परिपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments