पुणे, ६ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी चौथ्या लढतीत आरती केदार(३-१०), मुक्ता मगरे(२-१७), शरयू कुलकर्णी(२-३३) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसह तेजल हसबनीस(नाबाद ४३धावा), ईश्वरी अवसरे(३७धावा) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला निर्णय सोलापूरच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. सलामवीर स्म्रिती मंधाना(१)ला यष्टीच्या मागे शरयू कुलकर्णीने झेल बाद केले व रत्नागिरी संघाला पहिला धक्का दिला. काल अर्धशतकी खेळी करणारी गौतमी नाईक २० धावांवर तंबूत परतली. शरयू कुलकर्णीने तिला झेल बाद केले. शिवाली शिंदे(२५धावा), अनुश्री स्वामी(२०धावा), ज्ञानदा कदम(१५धावा) प्रियांका घोडके(१७धावा) यांना फारशी मोठी खेळी करता आली नाही. सोलापूर स्मॅशर्सकडून आरती केदारने १० धावात ३ गडी, मुक्ता मगरे(२-१७), शरयू कुलकर्णी(२-३३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून रत्नागिरी जेट्स संघाला १२० धावांवर रोखले.
हे आव्हान सोलापूर स्मॅशर्स संघाने १६ षटकात २बाद १२३ धावा काढून पूर्ण केले. ईश्वरी अवसरे व ईश्वरी सावकार या सलामी जोडीने ५४चेंडूत ५६ धावांची सलामी दिली. ईश्वरी सावकार १६ धावांवर असताना धावबाद झाली. त्यानंतर ईश्वरी अवसरेने ३३ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यात तिने ५चौकार व १ षटकार मारला. त्यानंतर तेजल हसबनीसने २३ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी सुरेख खेळी केली. तिने आपल्या खेळीत ६ चौकार व १ षटकार मारला. तेजलने मुक्ता मगरे(नाबाद १६धावा)च्या समवेत ३५ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: १९.३ षटकात सर्वबाद १२०धावा(शिवाली शिंदे २५(१८,२x४,१x६), अनुश्री स्वामी २०(२३,१x४), गौतमी नाईक २०, ज्ञानदा कदम १५, आरती केदार ३-१०, मुक्ता मगरे २-१७, शरयू कुलकर्णी २-३३) पराभुत वि.सोलापूर स्मॅशर्स: १६ षटकात २ बाद १२३ धावा(तेजल हसबनीस नाबाद ४३(२३,६x४,१x६), ईश्वरी अवसरे ३७(३३,५x४,१x६), मुक्ता मगरे नाबाद १६, नंदिनी सोनावणे १-२१); सामनावीर – शरयू कुलकर्णी.


