Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचना

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचना

पिंपरी, दि. १८ जून २०२५ – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज होत असताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पालखी मार्गालगत असलेल्या अधिकृत जाहिरात फलकधारकांना या आठवड्यात सुरक्षिततेसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच महापालिकेने शहरातील एकूण १,४९४ अधिकृत जाहिरात फलकधारकांना सूचनापत्रक देखील जारी केले आहे.
महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या सूचना विशेषतः निगडी ते दापोडी, देहू ते आळंदी आणि दिघी ते बोपखेल या पालखी मार्गांवर असलेल्या फलकांसाठी आहेत. मोठ्या प्रमाणावर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या फलकांची तातडीने तपासणी करून आवश्यक ते बळकटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उप आयुक्त राजेश आगळे यांनी सांगितले की, पालखी मार्गावरील सर्व फलकांना वैध परवाने व अद्ययावत संरचनात्मक स्थिरता (structural audit) प्रमाणपत्र देण्यात आली होती. तरीही खबरदारीच्या दृष्टीने प्रत्येक जाहिरात एजन्सीला त्यांच्या फलकांची स्थिती पुन्हा तपासण्याच्या व आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित एजन्सी जबाबदार असणार आहे.
सुरक्षा तपासणी अहवालानुसार, भक्ती शक्ती चौक ते दापोडी दरम्यानच्या ११ किमी अंतरात ७१ फलकांची तपासणी करण्यात आली आहे. चऱ्होली फाटा ते बोपखेल कॉर्नर या १२ किमी अंतरात ६४ फलक असून, देहू ते आळंदी या १५ किमी अंतरात ८० फलक महापालिका हद्दीत आढळले आहेत. हे सर्व फलक अधिकृत असून, त्यांचा आकार ४० x २० फूट पेक्षा अधिक नाही.
तपासणीदरम्यान कोणताही अनधिकृत फलक आढळलेला नाही. मात्र, कोणत्याही फलकाच्या सुरक्षेसंदर्भात धोका निर्माण झाल्यास महापालिका तत्काळ कारवाई करणार आहे. पालखी मार्ग सुरक्षित व सुरळीत पार पडावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक व स्वच्छता विभागांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.

कोट
आषाढीवारी पालखी सोहळा हा शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेत भर घालणारा सोहळा आहे. सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तरी खबरदारी म्हणून सर्व जाहिरात फलकधारकांनी नियमांचे पालन करून पालखी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments