Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedभक्ती आणि योगच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करुयात*  ...

भक्ती आणि योगच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करुयात*   *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वारकरी भक्तीयोग उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाखो वारकरी योग उपक्रमात सहभागी* 

 

 

पुणे : योग आपली ऐतिहासिक परंपरा असून, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकप्रकारे ही आपली चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटक मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तीयोग उपक्रमात शनिवारी व्यक्त केले.

 

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्या वतीने आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात ते बोलत होते. हा उपक्रम वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, गणेशोत्सव मंडळ, सामाजिक संस्थांची कार्यालये अशा १२२७ ठिकाणी उत्साहात पार पडला. या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ते, योग प्रशिक्षक अशा साधारण ८ लाखांहून अधिक जणांनी योगासने केली.यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त नवल किशोर राम, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य आणि उपक्रमाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योग हे आमचे प्राचीन ज्ञान असून, ते जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव ठरला. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते. भक्तीयोग कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याने एक अभिनव उपक्रम दिला आहे. त्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीमध्ये पुणेकर आणि वारकऱ्यांचा सहभाग असणारे भक्तीयोगाचे रिंगण हा नवीन आयाम प्रस्थापित होत आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

 

मंत्री पाटील म्हणाले, एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करीत असतील, ही अद्भुत बाब आहे. सुमारे ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योग, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून, यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा, अशी संकल्पना समोर आली. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, “योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला. विठ्ठलाच्या भेटीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरीला पायी चालत एक रिंगण पूर्ण करतात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी राज्यातील १३ कोटी जनतेच्या विकासाचे वारकरी आहेत.पुणे शहरातील १८७ महाविद्यालये, प्राचार्य, सुमारे बाराशे प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी यांनी योग दिनाचे नियोजन केले. शहरातील बहुसंख्य मंदिर, मठ, गुरुद्वारा आणि धार्मिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विविध समाज माध्यमांवर एकाच वेळेला त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसारण झाल्याने जगभरातील लाखो नागरिकांना त्याची अनुभूती घेता आली. या उपक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे.

 

यावेळी योग प्रशिक्षक डॉ. अनुराधा येडके आणि डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि डॉ. सदानंद भोसले यांनी केले.

…..

वारकऱ्यांसोबत योगासने करणे ही आनंदाची पर्वणी

….

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक भूमी, एक आरोग्य’ हा संदेश दिला आहे. या संदेश कृतीतून साकारणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करीत आहेत. पुणे विद्यापीठाला संलग्न ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

…..

शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्यवेळी होणार

……

राज्य सरकारने जनतेला दिलेला एकही शब्द आजपर्यंत फिरवलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येणार आहे. कर्जमाफी करण्यासाठी सर्वगोष्टी तपासून पाहून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments