पुणे: वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. सेवा कार्यामधून समाजाविषयी आपली भावना दिसून येते, त्यातून माणुसकीची जपणूक होते. धर्मरक्षण करण्यासोबतच व्यापक प्रमाणात सेवा कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात केले जात आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने पुणे ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते झाला. भवानी पेठेतील कोंढरे गल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर रुग्णवाहिका कार्यरत असणार आहेत
यावेळी प्रांतमंत्री किशोर चव्हाण, क्षेत्र धार्मिक कुंज प्रमुख संजय मुद्राळे, आरोग्य सेवा प्रमुख पी.एन.पुजारी, प्रांत धर्म प्रसार सहप्रमुख संजय कुलकर्णी, धर्माचार्य सहप्रमुख नागनाथ बोंगरगे, बजरंग दल संयोजक नितीन महाजन, वारी प्रमुख डॉ शर्वरी यरगट्टीकर, विशेष संपर्क विभागाचे श्रीकांत चिल्लाळ, पुणे पूर्व मंत्री धनंजय गायकवाड, पुणे पश्चिम मंत्री केतन घोडके, शरद जगताप, लीना भावे, विजय कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. एकनाथ पवार म्हणाले, ज्यावेळी वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा वारीत पुरविल्या जात नव्हत्या, तेव्हापासून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. आजही अखंडितपणे ही आरोग्यसेवा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात येत आहे, हे कौतुकास्पद आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मागील ३८ वर्षांपासून पुणे ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वारकरी बंधू भगिनींसाठी वैद्यकीय तथा आरोग्य सेवा देण्यात येते. आरोग्य पथकात रुग्णवाहिका डॉक्टर परिचारिका तसेच उत्तम दर्जाची औषधे यांचा समावेश असतो. प्लास्टिकमुक्त व पार्यावरणापूरक वारी व्हावी, यासाठी कार्यकर्ते ठिकठिकाणी प्लास्टिक गोळा करण्याकरिता उभे राहतील. वारीमध्ये समाजविघातक शक्तींचा शिरकाव झाला असून त्याला आळा घालण्यासाठी सजगता अभियान राबविण्यात येणा
र आहे.


