पुणे, २४ जून २०२५ : रक्तगट जुळत नसतानाही आईने दान केलेल्या मूत्रपिंडामुळे मुलाला नवजीवन मिळाले. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ११ जून २०२५ रोजी पुण्यातील नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथे यशस्वीरित्या करण्यात आली.
याविषयी माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील प्रत्यारोपण चिकित्सक (ट्रान्सप्लांट फिजिशियन) डॉ.अविनाश इग्नाशिअस म्हणाले की, महिन्याभरापूर्वी बांगलादेशमधील एक ३१ वर्षीय तरुण मूत्रपिंडाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. तो डायलिसिस वर होता. आयजीए नेफ्रोपॅथी ( बर्जर्स डिसीज) या आजाराने ग्रस्त होता. बायोप्सी ने या स्थितीचे निदान झाले होते. आयजीए नेफ्रोपॅथी या दुर्मिळ स्थितीत मानवी शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली असामान्यरित्या प्रतिपिंड तयार करते आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या मूत्रपिंडाच्या क्षमतेवर परिणाम करते आणि कालांतराने मूत्रपिंड निकामी होत जाते.याबाबतीत रुग्णासाठी प्रत्यारोपण हा एकच पर्याय उरला होता.
रुग्णाच्या कुटुंबात फक्त त्यांची आई मूत्रपिंड दान करण्यासाठी उपलब्ध होत्या. पण रुग्णाचे रक्तगट बी पॉझिटिव्ह तर आईचे एबी पॉझिटिव्ह होते. बी पॉझिटिव्ह साठी सामान्यपणे बी किंवा ओ रक्तगट असलेले दाते असणे गरजेचे होते. पण याबाबतीत पर्याय नव्हता. अशा वेळेस प्राप्तकर्त्याचे शरीर नवीन अवयव नाकारण्याची जोखीम असते. त्यामुळे रुग्णाच्या प्रतिपिंडाच्या बाबतीत चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर विशेष प्रकारचे इंजेक्शन देऊन प्रतिपिंड निर्माण करण्याची क्षमता कमी करण्यात आली. याशिवाय रक्तातील सद्य स्थितीतील प्रतिपिंड शरीराबाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा फेरेसिस ही प्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणाच्या पूर्ण प्रक्रियेत शरीर नवीन अवयव नाकारणे, कमी रोगप्रतिकारक शक्ती ही जोखीम होती आणि यासाठी प्रक्रियेपूर्वी आणि पश्चात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. आता रुग्णाच्या क्रियेटीनची पातळी सामान्य झाली असून रुग्ण घरी जाण्यासाठी सज्ज आहे .
रुग्णाला आपले दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी काही महिने विशेष काळजी घ्यावी लागेल.
प्रत्यारोपण टीम मध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अविनाश इग्नाशिअस व डॉ. राकेश शिंदे, प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.विक्रांत सातव व डॉ.शशिकांत भनगे , संवहिनी शल्यचिकित्सक (व्हॅस्क्युलर सर्जन) डॉ. शार्दुल दाते , भूलतज्ज्ञ डॉ.संगीता चंद्रशेखर आणि डॉ. नीलेश वस्मतकर व इंटेंसिविस्ट डॉ. बी.डी बांदे यांचा समावेश होता.
नोबल हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. दिविज माने म्हणाले की, अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत ही यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या टीमचे कौशल्य दर्शवते. वैद्यकीय तज्ञ, अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाच्या जेसीआय मान्यताप्राप्त प्रक्रियांसह, आम्ही रुग्णाला चांगल्या परिणामांसाठी सर्वोत्तम शक्य उपचार मिळतील यासाठी सातत्याने प्रयत्न
करतो.


