Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*डॉ. अरुण सोनाकिया यांच्या नर्मदा खोर्‍यातील शोधामुळे मानवी उत्क्रांती संशोधनात मोलाची भर...

*डॉ. अरुण सोनाकिया यांच्या नर्मदा खोर्‍यातील शोधामुळे मानवी उत्क्रांती संशोधनात मोलाची भर – डॉ. सुभाष वाळिंबे*

 

 

पुणे, दि. २५ – सुमारे दोन ते सहा लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या अस्तित्वाचा शोध नर्मदा खोर्‍यात अलिकडच्या काळात लागला, हा मानवी उत्क्रांतीच्या संशोधनातील महत्वाचा पुरावा डॉ. अरुण सोनाकिया यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाला, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मानववंशशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुभाष वाळिंबे यांनी आज येथे काढले. स्व. डॉ. अरुण सोनाकिया लिखित “नर्मदा खोर्‍यातून प्राचीन मानवाचा शोध” या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अजित वर्तक, डॉ. सोनाकिया यांची वास्तुविशारद असलेली मुलगी श्‍वेता सोनाकिया, भांडारकर संस्थेच्या नियामक परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप आपटे आणि कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन उपस्थित होते.

 

डॉ. वाळिंबे पुढे म्हणाले की, डॉ. अरुण सोनाकिया यांनी सन १९८२ मध्ये एका मानवी डोक्याच्या कवटीचा (जीवाश्म) शोध लावला, जी कवटी त्यांना मध्य प्रदेशातील नर्मदा नदीकाठी हथनोरा गावाजवळ मिळाली. या शोधामुळे या भागातील मानवी उत्क्रांतीबद्दलच्या आपल्या समजुतीत लक्षणीय योगदान मिळाले आहे. ज्यामुळे दक्षिण आशियातील सुरुवातीच्या मानवी अस्तित्वाचे ठोस पुरावे मिळाले. मानवी उत्क्रांतीमध्ये भारताचे महत्त्व स्थापित करण्यासाठी डॉ. सोनाकिया यांचा शोध फार महत्त्वाचा आहे. हा जीवाश्म सुमारे दोन ते सहा लाख वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. नर्मदा मानव म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जीवाश्माला भारतीय उपखंडातील सर्वात जुने ज्ञात मानवी पूर्वज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर वर्णन या पुस्तकात दिलेले आहे. डॉ. सोनाकिया यांच्या या संशोधनामुळे मानववंशशास्त्राबरोबरच भूगर्भशास्त्र आणि जीवाश्मशास्त्राच्या अभ्यासकांना एक महत्वाचा दुवा मिळाला आहे.

 

यावेळी बोलतांना डॉ. आपटे म्हणाले की, विज्ञान आणि इतिहास याचा शेवट कधीही नसतो, तर संशोधन हे अविरत सुरु ठेवायचे असते, ज्यामधून नवनवीन शोध लागतात आणि अभ्यासकांना पुढची पायरी गाठता येणे शक्य होते. भांडारकर संस्था अशा संशोधकांना आणि अभ्यासकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सातत्याने करीत आहे. यावेळी श्‍वेता सोनाकिया, डॉ. वर्तक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे कार्याध्यक्ष पटवर्धन यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनन्द बापट यांनी केले.

—————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments