Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 तर्फे शालेय वस्तू वितरण आणि सत्कार...

पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 तर्फे शालेय वस्तू वितरण आणि सत्कार सोहळा संपन्न

पुणे,28 जून 2025 : पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू वितरण समारंभ आणि सत्कार सोहळा नुकतेच वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुणे/मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.गिरीश डांगे व प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब विठ्ठलराव शिवरकर उपस्थित होते. यावेळी पुणे कॅन्टोमेंट बोर्डचे उपाध्यक्ष बापूसाहेब गानला, प्रो.मॅजिक ग्लास इंडस्ट्रीजचे माणिकराव कोद्रे, प्रो.व्हिक्टरी थिएटरचे फारूख चिनॉय,बुधानी वेफर्सचे दिलीप बुधानी,पूना चीप स्टोअर्सचे बिपीन शहा,वर्धमान असोसिएटसचे किशोर मेहता, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश होले, समाजसेवक शशिधर पूरम, ऑलिम्पिक वेटलिफ्टर विजेते शाम सहानी आणि जेष्ठ विधीज्ञ प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी गरजू आणि होतकरी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तयार असलेली पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी या स्मरणिकेचे प्रकाशन प्रो.संघवी असोसिएटस पुणेच्या आरती संघवी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात पुण्यातील 32 शाळांमधील 3000 विद्यार्थ्यांना सॅक बॅग,वह्या,कंपास,पेन्सिल,रबर अशा शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी कार्यक्रमात पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी तर्फे रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम हायस्कूल,कॅम्प या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर शेट्टी यांना समाजभूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.

 

पुणे/मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.गिरीश डांगे म्हणाले की, पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 तर्फे गेली 54 वर्षे गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी पतपेढीसाठी नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयी मार्गदर्शन, वाचनालय या नवकल्पना सुचवल्या.

 

यावेळी ॲड. प्रशांत यादव यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.

 

यावेळी विविध शाळांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून गौरविण्यात आले.

 

कै.नारायणराव केशवराव नेवसे यांनी 1971 साली पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढीला 1001 रूपयांची देणगी दिली होती. तेव्हापासून गरजू आणि होतकरी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी शालेय वस्तू वितरणाचा उपक्रम राबवत असून यंदाचे हे 54 वे वर्ष आहे. सीनर्जी मार्केटिंगचे संचालक दिलीपशेठ सराफ गेली कित्येक वर्षे संस्थेला सहयोग करत आहेत.

 

कार्यक्रमानंतर दिलीप बुधानी आणि महानाज रेस्टॉरंट तर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये ॲड.विशाल खुर्पे,ॲड.आशिष खुर्पे,योगेश खुर्पे,श्रीकांत खुर्पे, अशोक धाडगे,पंकज धाडगे,साबीर चेरावला,किशोर शिवरकर,उषा माळी,कुसुम शेलार आणि ॲड.अर्जुन खुर्पे यांचा समावेश होता.

 

शालेय वस्तू वितरण व सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या पूर्वार्धात शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर केले. यामध्ये सूर्यनमस्कार, मल्लखांब, लोकनृत्य यांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी साळुंके,वनिता खुर्पे व विशाल खुर्पे यांनी तर आभार प्रदर्शन वनिता खुर्पे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments