Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedऔषधासोबतच डाॅक्टर जगण्याचे बळ देतात एमएमआरडीए अतिरिक्त जिल्हाधिकारी अमृत नाटेकर जनरल प्रॅक्टिशनर्स...

औषधासोबतच डाॅक्टर जगण्याचे बळ देतात एमएमआरडीए अतिरिक्त जिल्हाधिकारी अमृत नाटेकर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान व वैद्यकीय परिषद सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार डॉ. सुनिल अंभोरे यांना प्रदान

 

पुणे : जेव्हा रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडतो. तेव्हा तो देवासोबतच त्याला वाचवणाऱ्या डाॅक्टरांसमोर देखील नतमस्तक होतो. डाॅक्टर रुग्णाला औषधासोबतच जगण्याचे बळ देखील देतात. रुग्णाला आधार आणि मार्गदर्शन करतात. समाजाने डाॅक्टरांचे कितीही ऋण फेडले तरी ते कमीच ठरेल. असे मत एमएमआरडीए, वांद्रेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी व्यक्त केले.

 

डॉक्टर्स डे निमित्ताने जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,पुणे आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅक्टर्स डे निमित्त वैद्यकीय परिषद आणि सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात वर्षातील सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार डॉ. सुनिल दिवाकर अंभोरे यांना प्रदान करण्यात आले. पगडी, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून पुणे महानगरपालिका वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष डॉ. सुनिल भुजबळ, उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब काकडे, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ.राजेश दोशी, सहसचिव हे पदाधिकारी उपस्थित होते.

 

वैद्यकीय परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉ. साक्षे जैन यांचे द ट्रिनिटी थर्ड जेंडर, डॉ. कपिल झिरपे यांचे हवेद्वारे पसरणाऱ्या आजारांवरील संक्रमण नियंत्रण, डॉ. हिमेश गांधी यांचे युरोलॉजीमधील रोबोटिक सर्जरी व प्रोस्टेट वरील मिनिमली इनवेसिव्ह सर्जरी, डॉ. उर्मी शेठ यांचे रक्तक्षयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, डॉ. पियुष लोढा यांचे एन्डोक्रायनॉलॉजीतील रंजक केसेस, डॉ. सायमन ग्रांट यांचे वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवनवीन प्रयोग या विषयावर व्याख्याने झाली.

 

अमृत नाटेकर म्हणाले, डॉक्टर हे चालते बोलते देव आहेत,आपल्यासाठी ते देवासमान आहेत. कोविड सारख्या काळात त्यांनी देवदूतासारखी भूमिका बजावली. जेव्हा संपूर्ण देश आणि जग महामारीच्या संकटात अडकले होते, तेव्हा डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून जगाला वाचवण्याचे कार्य केले.

 

प्रल्हाद पाटील म्हणाले, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद चांगला असला पाहिजे. विशेषतः ग्रामीण व झोपडपट्टी भागातील चालीरीती, परंपरा यांची माहिती डॉक्टरांना असली पाहिजे, ज्यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास बसेल. रुग्णांची सेवा करत असताना, डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे.

 

डॉ. सुनिल भुजबळ म्हणाले, सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार देणे म्हणजे डाॅक्टरांच्या केवळ कामगिरीचा गौरव नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण आणि अथक सेवाभावाचे कौतुक आहे. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता यांनी सूत्रसंचालन केले व सचिव डॉ. राजेश दोशी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments