Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए, आयआयटीबी आणि एलजेएमयूच्या कार्यशाळेचा इंग्लंडमध्ये समारोप त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील शाश्वतता...

बीएनसीए, आयआयटीबी आणि एलजेएमयूच्या कार्यशाळेचा इंग्लंडमध्ये समारोप त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील शाश्वतता व चक्रीय अर्थकारणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे, दि.८ : इंग्लंडमधील लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठ (एलजेएमयू),आयआयटी बॉम्बे (आयआयटीबी), महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) तसेच पुण्यातील कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरींग रिसर्च फौंडेशन (पीसीइआरएफ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप नुकताच इंग्लंड येथील लिव्हरपूल येथे संपन्न झाला. यानिमित्ताने बांधकाम क्षेत्रातील शाश्वतता तसेच चक्रीय अर्थकारणाबाबतचे मार्गदर्शन बीएनसीए व आयआयटीबीतील सहभागी विद्यार्थ्यांना मिळाले.

 

या कार्यशाळेत भारतातर्फे बीएनसीए आणि आयआयटीबीमधील मिळून दहा विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. चक्रीय अर्थकारणातून (सर्क्युलर इकॉनॉमी) शाश्वत बांधकाम पर्यावरण निर्मिती, नाविन्यपूर्ण बांधकाम साहित्य, शाश्वततेसंबंधी धोरणात्मक नियोजन, संशोधन पद्धती, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, डिजिटल वर्कफ्लो आणि चक्रीय अर्थकारणाचे व्यावसायिक प्रारूप (बिझीनेस मॉडेल) इत्यादी विषयांवर विद्यार्थी संशोधन करत आहेत. या संशोधनासंबंधी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय, ब्रिटिश कौन्सिल, इंग्लंड आणि स्कीम फॉर प्रमोटिंग फॉर अॅकॅडमिक रिसर्च (एसपीएआरके) यांच्या संयुक्त निधी उभारणीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘केपेबल’ (कपॅसिटी बिल्डिंग इन बिल्ट एनव्हायरमेंट सस्टेनेबिलिटी रिसर्च) या मायाजालाचे (वेबसाईट) उदघाटन गेल्या वर्षी बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांनी केले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बीएनसीएमध्ये पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ‘इंडिया ट्रेनिंग फॅकल्टी अँड स्टूडंट्स मोबीलिटी’ असे त्याचे नाव असून त्यामध्येही भारत व इंग्लंडमधील मिळून १४ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

 

लिव्हरपूलमधील कार्यशाळेत आयआयटी बॉम्बेमधील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्हज फॉर रूरल एरियाजच्या (सीटीएआरए) डॉ. बकुल राव तसेच या प्रकल्पाच्या सह-संशोधक (भारत) डॉ. वैशाली अनगळ, इंग्लंडमधील एलजेएमयूच्या मुख्य संशोधक डॉ. अनुपा मनेवा आणि सह-संशोधक डॉ. मोहन श्रीवर्धना यांनी प्रशिक्षणाचे नेतृत्त्व केले. याशिवाय बीएनसीएमधील प्राध्यापक डॉ. सुजाता कर्वे, डॉ. अमृता गरूड ही त्यात सहभागी झाल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये बीएनसीएमधील रिया देशमूख, प्रेरणा चोपडे, तनया टकले, शगून शाह, निशिगंधा साखरदंडे, सिंहीका देशमूख आणि समृद्धी शेंडे, तर आयआयटीबीतर्फे मेघराज गरड, श्रीया भाटिया आणि हर्षल काटे यांचा समावेश होता.

 

लिव्हरपूलमधील कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना सलग वीस दिवसांच्या प्रशिक्षणाबरोबरच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय लिव्हरपूल व लंडन येथील सुप्रसिद्ध व वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंनाही भेटी देता आल्या.यानिमित्त आयआयटीबी, बीएनसीए, एलजेएमयू यांच्यात विविध विषयांवरील सहा क्षेत्रांबाबत एकत्र काम करण्याचे ठरवण्यात आले. त्यामध्ये संयुक्त संशोधनाचे काम, विद्यार्थी आदान-प्रदान आणि अभ्यासक्रम विकास इत्यादी महत्वाच्या विषयांचा समावेश आहे. या प्रकल्पाची सांगता फेब्रुवारी २०२६ मध्ये पीसीआरईएफच्या सौजन्याने मुंबईत आयआयटीबीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेने होणार आहे. त्यामध्ये या दोन वर्षांमधील केलेल्या अभ्यास व संशोधनाचे फलीत सादर करण्यात

येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments