सोलर फोटोव्होल्टेइक मॉड्युल्स आणि सोलर सेल्स निर्मिती करणाऱ्या एमव्ही फोटोव्होल्टेइक पॉवर लिमिटेडने आयपीओद्वारे 3,000 कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक मसुदा दस्तावेज (डीआरएचपी) दाखल केला आहे.
डीआरएचपीनुसार, या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीत (आयपीओ) 2,143.86 कोटी रुपयांचे नव्या समभागांचे इश्यू आणि 856.14 कोटी रुपयांचे प्रमोटर्सकडून ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.
या इश्यूमधून उभारलेला निधी कंपनी आणि तिच्या प्रमुख सहायक संस्थेने घेतलेल्या कर्ज व व्याजाच्या परतफेडीसाठी किंवा आगाऊ परतफेडीसाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येईल.
बेंगळुरूस्थित एमव्ही फोटोव्होल्टेइक पॉवर लिमिटेड प्री-आयपीओ प्लेसमेंटमधून 428.77 कोटी रुपये उभारू शकते. ही रक्कम उभारण्यात आली, तर ती एकूण नव्या समभागांच्या इश्यूमधून वजा करण्यात येईल.
एमव्ही फोटोव्होल्टेइक पॉवर ही एक आघाडीची पूर्णतः सौर फोटोव्होल्टेइक (PV) मॉड्युल आणि सोलर सेल उत्पादन करणारी समाकलित कंपनी आहे. मे 31, 2025 पर्यंत कंपनीकडे 7.80 GW क्षमतेची सोलर PV मॉड्युल उत्पादन सुविधा आणि 2.94 GW क्षमतेची सोलर सेल उत्पादन क्षमता आहे.
क्रिसिलच्या अहवालानुसार, भारतातील सौर PV मॉड्युल आणि सोलर सेल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मार्च 2022 मध्ये अनुक्रमे 21 GW आणि सुमारे 3.2 GW असलेली क्षमता, मार्च 2025 पर्यंत वाढून अनुक्रमे 82 GW व 23 GW इतकी झाली आहे. ही वाढ केंद्र सरकारच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणामुळे, बाजारातील मागणी आणि नव्याने वाढलेल्या नवीकरणीय ऊर्जेच्या वचनबद्धतेमुळे झाली आहे.
क्रिसिलच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2030 अखेरपर्यंत भारतातील सौर मॉड्युल आणि सोलर सेल उत्पादन उद्योगांची नाममात्र क्षमता अनुक्रमे 175-185 GW आणि 85-95 GW पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी जेएम फायनान्शियल, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस, जेफरीज इंडिया आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी यांची मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


