दोन अन् दोन चार
चार दुणे आठ
गणिताच्या गावाची
धरली मी वाट
अशीच रंजक गाणी गात, नाटिका सादर करत प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी दिवसभर हसतखेळत गणितातील गंमतीजमती अनुभवल्या . निमित्त होते अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत आयोजित पाय दिवसाचे ! मा. शालाप्रमुख श्रीम. दीपा अभ्यंकर, उपशालाप्रमुख मा. श्री. सुरेश वरगंटीवार, पर्यवेक्षिका मा. श्रीम. स्वाती जज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषय शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यानिमित्ताने गणित प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करून विविध गणिती संबोध खेळांच्या, कृतींच्या माध्यमातून करून पाहण्याची संधी विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यात आली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. डॉ. सृजना आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गणित विषयशिक्षक उपस्थित होते. श्रीम. विमल भवारी, श्रीम. अमृता रामदासी , श्रीम. सुजाता तळपे व श्रीम. अनिता जाधवर यांनी मा. पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन केले.
तसेच या दिनाचे औचित्य साधत इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणिताचे दैनंदिन जीवनातील अनन्य साधारण महत्त्व व गणिताचा प्रत्येक क्षेत्रात होणारा वापर अतिशय रंजक पद्धतीने व्याख्यात्या मा. डॉ. सृजना आचार्य यांनी मांडला. तसेच अभ्यास विषय म्हणून गणिताची निवड करण्यासाठी व गणित संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अमृता रामदासी यांनी केले. इयत्ता ७ वी यमुना वर्गातील कु. पूर्वी सासणे या विद्यार्थिनीने आभार व्यक्त केले.


