पुणे,28 जुलै 2025 : रूग्णांना योग्य माहिती पोहचविण्याच्या आणि त्यांच्या मुत्रपिंडाबाबत असलेल्या सामान्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरने 24 तास एआय चॅटबोट सेवा सुरू केली आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,ही संकल्पना डॉ.अविनाश इग्नाशिअस यांची असून हे अभिनव साधन इंग्रजी,मराठी,हिंदी व इतर भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून मुत्रपिंडाचे आजार असलेल्या रूग्णांच्या सामान्य प्रश्नांचे उत्तर या एआय चॅटबोटच्या माध्यमातून मिळेल.
यातील माहिती स्त्रोत हॉस्पिटलच्या मुत्रपिंड तज्ञांच्या सहकार्याने निवडण्यात आले असून हा चॅटबोट मुत्रपिंडाचे आरोग्य,जीवनशैली,आहार आणि अशा प्रकारच्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची विश्वसनीय व समजण्यास सोपी उत्तरे देतो. हा चॅटबोट देत असलेली सर्व माहितीचे स्त्रोत रूग्णालयाच्या तज्ञांकडून वैद्यकीयदृष्टया तपासले गेले आहेत.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अविनाश इग्नाशिअस म्हणाले की, दीर्घकालीन मुत्रपिंडाचे आजार हे रूग्णांसाठी आव्हानात्मक असतात.त्यांच्या मनात अनेक सामान्य परंतु तातडीचे प्रश्न असू शकतात.ही दरी भरून काढण्यासाठी आणि रूग्णांची उत्तरे जेव्हा जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्यांना मिळावी म्हणून हे एआय चॅटबोट उपयुक्त ठरते.
हे एआय चॅटबोट एका लिंक किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध असून रूग्णांना आरोग्याबाबत योग्य माहिती देण्यासाठी रूग्णालयाच्या व्यापक डिजिटल हेल्थ उपक्रमाचा एक भाग आहे.
डॉ.इग्नाशिअस पुढे म्हणाले की,चॅटबोट हा वैद्यकीय सल्ला आणि उपचाराचा पर्याय नाही.परंतु रूग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी एक मौल्यवान साधन ठरू शकते.
डॉ.दिविज माने पुढे म्हणाले की,हे तज्ञचलित एआय साधन अशा प्रकारचा अनोखा उपक्रम असून यामुळे अधिक सुलभपणे विश्वसनीय वैद्यकीय माहिती रूग्णांना मिळू शकेल.


