Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतिपुत्र अण्णाभाऊ : साहित्यिकांचा साहित्यिक - आचार्य रतनलाल...

क्रांतिपुत्र अण्णाभाऊ : साहित्यिकांचा साहित्यिक – आचार्य रतनलाल सोनग्रा

महाराष्ट्राचे प्रख्यात इतिहास संशोधक, लेखक आणि भाष्यकार भा. ल. ठाणगे यांनी लोकक्रांतिकारक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या साहित्य निर्मितीवर हे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. या देशात वर्ण, जात नावाचे एक भीषण वास्तव आहे, जे आधीच आपणाला बंधनात अडकवते… या जाती-जातीचे समूह म्हणजे अदृश्य भिंतीची स्वतंत्र राष्ट्रे किंवा स्वायत्त राज्ये होत. आपली आर्थिक स्थिती कितीही खालावलेली असो, आपला सन्मान इतरत्र कुठेही असो वा नसो पण जातीत मात्र महत्त्वाची खात्री असते. बाहेर स्वामीच्या लाथा खाणारा देखील ‘पंचा’ च्या भूमिकेत स्वतःला ‘राष्ट्रपती’ समजतो. काही जातीची कामे जशी जन्माने निश्चित होतात तशी ‘काही’ ची ‘पत’ देखील शासनात निश्चित होते. काही जमातीवर गुन्हेगारीची ‘तप्तमुद्रा’ अंकीत केल्याने त्यांना तसे वागणे भाग पाडायला लावणारी व्यवस्था सतत त्यांना बांधून ठेवते.

१ ऑगस्ट १९२० साली वाटेगाव येथील ‘मातंग’ कुळात अण्णाभाऊंचा जन्म झाला. घरात काहीच नसल्याने ‘केवळ चुली पुरते घर – अन् सगळीकडे रानावनात वावर’ होता. जन्मतःच हलाखीत एक चलाखी पण येते… शाळा शिकता आली नाही तरी जीवन त्यांना सर्व शिकवत असे. गोरगरिबांचे राज्य आणण्यासाठी झटणारे क्रांतीसिंह नाना पाटील यांची- तुकारामाने म्हणजेच अण्णाभाऊने सेवा केली… लहान पोरांना देखील ही अन्यायी राजवट बदलून टाकाविशी वाटली… काही कारण नसताना पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागे… जगण्यासाठी साठे कुटुंबाने मुंबईची वाट धरली. ‘मुंबई’ ही खर्‍या अर्थाने माणसांची सरसिमळ झालेली नगरी होती… इथे मुंबईकर फक्त रस्त्यावर एक होतो, बाकी सर्व जाती जमातीच्या वस्त्या, गल्ल्या, झोपडपट्ट्या चाळी, सोसायट्या, नगरे आणि समाज मंदिरे आहेत.

साम्यवादी आंदोलन : मुंबई ही मोठमोठ्या कारखान्याची, कापड गिरण्यांची नगरी होती. मजूरांची मोठी वस्ती लालबागला होती. या परळ लालबाग वस्तीत सत्यशोधक चळवळ, साम्यवादी चळवळ प्रभावशाली होती. ‘लालबावटा’ हा कामगरांचा दाता आणि त्राता होता. तुकाराम ऊर्फ अण्णाभाऊ मिळेल ते काम करून मोलमजूरी करून पोट भरू लागले. कधी माळी काम, घरगडी, रोजंदारीवर मजूरी, कुत्र्याला सांभाळणारा, फक्त जगण्यासाठी धडपडणारा हा जीव माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ‘लाल बावटा’ कार्यकर्त्यांच्या जवळ आला आणि त्याने या जगाचे रहस्य ओळखले. एक जागतिक विचारधारेशी त्याची नाळ जुळली. ‘जगातील कामगारांनो, एक व्हा. गमवायला तुमच्याकडे काहींच नाही !’ ही तत्त्वज्ञ कार्ल मार्क्सची घोषणा सर्वत्र घुमत होती. मार्क्स बाबाच्या तत्त्वज्ञानाने श्रमिकवर्गाला मोठी आशा होती.

आतापर्यंत जगातील मोठमोठ्या, ज्ञानी लोकांनी महर्षींनी, आचार्यांनी, तत्त्वज्ञांनी ‘जग काय आहे ? कसे आहे ? याचा अर्थ काय ? हे कोणी बनविले ? त्याला कोणी बनवले. जन्माआधी आणि जन्मानंतर काय ? याचे विवेचन केले आहे. पण हे दुःखमय जग बदलायचे कसे हे कोणी सांगितले नाही. तथागत बुद्धाने जगाच्या दुःखाचा विचार केला, उपायांचा विचार केला आणि ‘मध्यम मार्ग’ दाखवला… त्यानंतर १९ व्या शतकात कार्ल मार्क्सने दुःखावर उपाय म्हणून साम्यवादाचा जाहीरनामा मांडला… आतापर्यंत दुःखी कष्टी, श्रमिक माणसाला प्रत्यक्षात कुणी काही दिले नाही ! कुणी ‘प्रेम’ वाटायला सांगितले.. कुणी ‘नाम’ घेण्याचे साधन दिले, कुणी पुढच्या जन्माचे उधार आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात अन्न, वस्त्र निवारा, यांचे वाटप साम्यवादी तत्त्वज्ञानाने केले. रशिया, चीन आणि छोटी मोठी राष्ट्रे बदलली. अर्धे जग मुक्त झाले.

या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी हजारो कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व वेचले. ज्या ज्या माध्यमातून समतेचा प्रसार करता येईल, माणुसकीचा आविष्कार करता येईल, मुक्त समाज जीवनाचा पुरस्कार करता येईल ते ते सर्व गीत, गायन, पोवाडे, नाटक, कादंबरी, लोकनाट्य या सर्वांचा वापर अण्णाभाऊंनी केला… बुद्ध आणि मार्क्स यांचे तत्त्वज्ञान जाणणारा, त्यातही भारतीय जातीयवादाचे मर्म जाणणारा एक ‘महानायक’ आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! त्याने जातियवादावर जालिम प्रहार केले, वर्ग काढ्याला वर्णभेदाच्या चळवळीची जोड दिली. म्हणून अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीला वंदन केले. अण्णाभाऊंनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले आणि-

‘जग बदल घालुनि घाव ! सांगुनि गेले मला भीमराव !’

ही महागर्जना केली – या सर्व लढ्याचा मी सहभागी आणि साक्षीदार आहे. आपल्या ‘फकिरा’ या पुस्तकाची प्रत स्वतः अण्णाभाऊंनी मला भेट दिली. अमर शेख यांनी आपला ‘कलश’ काव्यसंग्रह दिला. गव्हाणकर आणि वा. वि. भटांनी आपल्या रचना दिल्या. लाखो लोक बेभान आणि बेफाम होऊन – त्यांच्या कलापथकाचे कार्यक्ररम पहात होते… अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ चित्रपट काढला. यशवंतराव चव्हाणांनी कौतुक केले. पण अण्णाभाऊ कर्जात आणि कौटुंबिक कलहात अडकले. अत्यंत शोकाकुल अवस्थेत ते गेले. आम्ही मृतपूजक संस्कृतीचे लोक आता त्यांच्या प्रत्येक गुणांना आठवून ‘उत्सव’ करीत आहोत. पण निदान आता साहित्यिकांनो विसरू नका, त्यांची साथ सोडू नका !

– रतनलाल सोनग्रा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments