पुणे, दि. 31: महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, विविध योजनांची माहितीसह अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळण्याकरिता 1 ते 7 ऑगस्ट 2025 कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.अधिकाधिक नागरिकांनी या सप्ताहात सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी केले आहे.
यामध्ये 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, 5 ऑगस्ट रोजी विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, संगायो व पुरवठा लाभार्थींचे ई केवायसी पूर्ण करणे, 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे, कब्जेहक्क भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींची तपासणी करणे आणि 7 ऑगस्ट रोजी एम-सँड (M-Sand) धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ याबाबत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही श्री. लबडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000


