वसई-विरार :
सामाजिक बांधिलकी जपत, मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपणाऱ्या दोन कुटुंबांनी एकाच दिवशी दोन देहदान आणि एका नेत्रदानाचा निर्णय घेतला. या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवार, २ ऑगस्ट २०२५ या दिवशी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्राला याचा मोठा लाभ होणार आहे.
पहिल्या घटनेत कांदिवली येथील रहिवासी जितेंद्र रामजी चितलिया (वय ८४) यांचं निधन झाल्यानंतर, त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र राजेश आणि अमित चितलिया तसेच कुटुंबातील सदस्य मनीष विनोदराय गांधी यांनी देहदानासाठी पुढाकार घेत पुरुषोत्तम पवार यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक सर्व औपचारिकता पार पाडली. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये हे देहदान यशस्वीरित्या पूर्ण झाले.
दुसऱ्या घटनेत साईनगर वसई पश्चिमचे रहिवासी कृष्णराज गोपाळदास पालेजा (वय ७४) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केवळ देहदान नव्हे तर नेत्रदान करण्याचाही निर्णय घेतला. दुःखाच्या क्षणीही समाजोपयोगी विचार करत त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. या प्रक्रियेत सागर वाघ यांच्या सहकार्याने डॉ. निकम आणि डॉ. अवधेश मिश्रा यांनी नेत्रसंकलनाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देह नालासोपारा येथील दुबे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. संपूर्ण समन्वयासाठी कुसुम इगी मेनेजेस आणि जॉनी मेनेजेस यांनी अथक मेहनत घेतली.
या दोन्ही घटनांमध्ये सहभागी कुटुंबियांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता हे आजच्या काळात खऱ्या अर्थाने अनुकरणीय ठरेल. मृत्यू ही एक अटळ गोष्ट असली, तरी मृत्यूनंतर आपल्या शरीराचा उपयोग वैद्यकीय शिक्षणासाठी व्हावा, ही भावना अनेकांना प्रेरणा देणारी आहे. हीच भावना ‘देहातून देवतेकडे’ जाण्याचा मार्ग दाखवते.
फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, “देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी मानवी शरीरशास्त्र अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात. मानवी देहातील अनाकलनीय गुढ नीट समजावून घेतल्यास भविष्यातील कुशल डॉक्टर घडवण्यासाठी ही एक अमूल्य संधी ठरते. समाजाने याकडे केवळ धार्मिक वा भावनिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मृत्यूनंतरचे आयुष्यही अर्थपूर्ण करण्याचा विचार करून सकारात्मक पाठिंबा दिला पाहिजे.”
‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्था गेल्या बारा वर्षांपासून नेत्र, त्वचा, अवयव व देहदान विषयक जनजागृती आणि समन्वयाचे काम करत आहे. अशा घटनांमुळे ही चळवळ अधिक व्यापक होत असून, समाजात सकारात्मक मानसिकता निर्माण होत आहे.


