Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री तुळशीबाग महागणपती भव्य सांस्कृतिक महोत्सव ‘मराठी बाणा’, ‘अमृतस्वर’, 'द फोक आख्यान'...

श्री तुळशीबाग महागणपती भव्य सांस्कृतिक महोत्सव ‘मराठी बाणा’, ‘अमृतस्वर’, ‘द फोक आख्यान’ यांसारखे दर्जेदार कार्यक्रम : दि. ८ ते १० ऑगस्ट दरम्यान आयोजन

पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे दररोज सायंकाळी ६ वाजता विविध कार्यक्रमांची मेजवानी पुणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे. सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्ष स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.

या सांस्कृतिक महोत्सवात प्रेक्षकांसाठी ‘मराठी बाणा’, ‘अमृतस्वर’, आणि ‘द फोक आख्यान’ हे दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून सादर होणारा ‘मराठी बाणा’ हा ७० एमएम मराठी कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी सादर होणारा संवाद पुणे निर्मित ‘अमृतस्वर’ हा सांगितीक कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी असेल. या कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची आहे. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना श्रीनिवास खळे यांच्या नावाने व गायिका शैला दातार यांना माणिक वर्मा यांच्या नावाने विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मानपत्र, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाचा समारोप दि. १० ऑगस्ट रोजी ‘द फोक आख्यान’ या लोककलांच्या कार्यक्रमाने होणार असून, यावेळी तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापाऱ्यांना ‘तुळशीबाग व्यापार भूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल, उद्योजक पुनीत बालन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमांमुळे पुणेकरांना एक संस्मरणीय अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे सुनील महाजन यांची आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकर रसिक श्रोत्यांनी महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments