Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंडळापेक्षा आपण बाप्पाचे कार्यकर्ते आमदार हेमंत रासने यांचे मत : तुळशीबाग सार्वजनिक...

मंडळापेक्षा आपण बाप्पाचे कार्यकर्ते आमदार हेमंत रासने यांचे मत : तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

पुणे : गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा केवळ गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर तन, मन आणि धनाने समर्पित भावनेने समाजासाठी कार्यरत असतो. गणेशोत्सव हा वाजतो, गाजतो आणि लढायला देखील शिकवतो. धर्म, संस्कृती आणि परंपरेबरोबरच समाजकार्यात मंडळाचा कार्यकर्ता नेहमी सक्रिय असतो. म्हणून हा उत्सव आज जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. पुण्यातील प्रत्येक मंडळ ही केवळ एक व्यवस्था असून सर्व मंडळे एकत्रितच आहेत. आपण सर्व मंडळापेक्षा बाप्पाचे कार्यकर्ते आहोत, असे मत आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान बाजीराव रस्त्यावरील नूमवी प्रशालेत करण्यात आला. यावेळी स्वरूपवर्धिनी संस्थेला निधी देण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, स्वरूपवर्धिनीचे शिरीष पटवर्धन, मंडळाचे स्वागताध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते.

धीरज घाटे म्हणाले, समाजात कोणतीही आपत्ती आली तरी सर्वप्रथम मदतीला धावतो तो गणेशोत्सव कार्यकर्ता. गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा केवळ गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर एक ऊर्जा घेऊन समाजासाठी काम करीत असतो. सर्वांच्या पाठीमागे बाप्पांचा आशीर्वाद असतो, त्यामुळेच चांगले कार्य करण्याची एक ऊर्जा आपल्यामध्ये येते, असेही त्यांनी सांगितले.

श्रीकांत शेटे म्हणाले, उत्सव म्हणजे आनंद आहे. संघर्ष, भांडणे, मोर्चा म्हणजे उत्सव नाही. वारसा जपायचा असतो आणि तो वृद्धिंगत करायचा असतो. हे वृद्धिंगत करण्याचे काम मंडळाचा कार्यकर्ता करतो. आज या उत्सवाला राज्यमान्यता मिळाली असून केवळ पैसे आणणे म्हणजे राज्यमान्यता नाही तर त्या उत्सवाला राजमान्यता प्राप्त करून देण्याचे काम हेमंत रासने यांनी करून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, ज्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी मंडळासाठी व सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आणि आजही देत आहेत, तसेच या सामाजिक कार्याचा वारसदार पुढील पिढीला सोपवणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला. मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments