पुणे,7 ऑगस्ट 2025 : जागतिक दर्जाची नेत्रसेवा सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत पीबीएमएच्या एच व्ही देसाई आय हॉस्पिटलने कल्याणी नगर येथे मेट्रो स्टेशन नवीन विस्तार केंद्राचे आज उद्घाटन केले.या प्रकल्पाला देसाई ब्रदर्सचे सहकार्य लाभले आहे.उद्घाटनप्रसंगी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) चे चेअरमन नितीन देसाई,अध्यक्ष राजेश शहा, एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया, वैद्यकीय संचालक डॉ.कुलदीप डोळे व डॉ.सुचेता कुलकर्णी,मुख्य कामकाज अधिकारी डॉ.सुशिला कावडे-भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या केंद्रामध्ये डोळ्याच्या विविध तपासण्या करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत उपकरणे तसेच चष्मा व लेन्सेससाठी एक विभाग आहे.लवकरच येथे अद्ययावत शल्यचिकित्सा कक्ष सुरू करण्यात येईल.या केंद्रासह एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे आता दोन विस्तार केंद्रे असून पहिले नंदुरबार येथे आहे.दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे महाराष्ट्रात 46 व्हिजन सेंटर्स आहेत.
एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया म्हणाले की,जागतिक दर्जाची नेत्रचिकित्सा प्रदान करण्याचा वारसा पुढे नेत हे केंद्र तज्ञ कार्यकुशलता व प्रगत तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या नेत्रसेवा प्रदान करेल.आमच्या संपूर्ण टीमच्या समर्पिततेमुळेच एच व्ही देसाई आय हॉस्पिटल चिकित्सा,शिक्षण आणि संशोधनासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून ओळखले जाते.लवकरच आम्ही सोलापूर येथे अद्ययावत युनिट सुरू करत आहोत.
पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) चे चेअरमन नितीन देसाई म्हणाले की,समाजातील सर्व घटकांसाठी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.हे विस्तार केंद्र कल्याणी नगर व नजिकच्या भागातील नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल.अशाच प्रकारचे विस्तार केंद्र शहरातील इतर भागातही आम्ही सुरू करू शकू असा आम्हाला विश्वास आहे.


