Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedभव्य मयूर रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे...

भव्य मयूर रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष

पुणे: फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर, स्नेहल नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

 

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. आगमन मिरवणूक मार्ग अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक – गोटीराम भैया चौक येथून उत्सव मंडप असा असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक वादन करतील.

 

कृष्णकुंज’ मध्ये विराजमान होणार शारदा गजानन

 

यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान होणार आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात ‘कृष्णकुंज’ ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात येणार आहे. तब्बल ९० फूट बाय ६० फूट आकारात सजावट असणार आहे. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती असेल. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेतील. याशिवाय ५ ते ६ मोठी झुंबरे देखील लावण्यात येणार आहेत.

 

दर तीन वर्षांनी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. हा झोपाळा राजस्थानी शैलीने फुलांनी सजवण्यात येणार आहे. कृष्णकुंज सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल ४० कारागीर काम करत असून, संपूर्ण कलादिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांचे आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments