पुणे, 22 ऑक्टोबर २०२६ :कला ही केवळ जागा सजवत नाही तर मनात जागा निर्माण करते, प्रश्न विचारते आणि आपल्या स्वतःच्या संस्कृतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास शिकवते आणि म्हणून कलाकृती पाहतांना सौंदर्याबरोबरच त्या चित्रा मागचा विचार काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे असे मत कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले . चित्रसूत्र आर्ट स्टुडिओ,पुणे यांच्या वतीने आयोजित ‘अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली’ या विशेष चित्र प्रदर्शनाचे उदघाटन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी प्रदर्शनाचे आयोजक व चित्रकार सुनील बलकवडे, सुरज रिअल्टी चे संचालक सुरज डागा , पीएनजी अँड सन्स च्या औंध शाखेच्या प्रमुख निशा गवांडे आदी मान्यवर उपस्थित होते . सुनील बलकवडे आणि डॉ. भारती माटे यांच्या कलाकृतींचा समावेश असलेले हे प्रदर्शन २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत औंध येथील पीएनजी अँड सन्स आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले की तंत्रज्ञान आणि जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे, पण ज्याला आपल्या मुळांबाबतची जाणीव असते तोच आधुनिकतेकडे आत्मविश्वासाने पाहू शकतो. कला ही केवळ जागा सजवत नाही तर मनात जागा निर्माण करते, प्रश्न विचारते आणि आपल्या स्वतःच्या संस्कृतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास शिकवते आणि म्हणून कलाकृती पाहतांना सौंदर्याबरोबरच त्या चित्र मागचा विचार काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे . रंग बदलतात, काळ बदलतो, पण सूदर्शनची ज्योत कधीही विझत नाही, आणि भारतीय संस्कृती ही ज्योत जेव्हा आधुनिक कलेच्या रंगामध्ये उमटते, तेव्हा निर्माण होतं एक नवीन विश्व, एक नवीन विचारविश्व आणि खऱ्या अर्थाने क्वांटम व्हिजन या प्रदर्शनात हेच दिसून येते . हे प्रदर्शन म्हणजे भारतीय परंपरातेला आधुनिक कला दृष्टीकोनातून अनुभवायची संधी आहे .
ते म्हणाले की रांगोळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात रेषा, रंग, आकृती आणि सौंदर्य.पण भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी ही केवळ सजावट नाहीये, ती भूमीशी संवाद आहे, रंग म्हणजे भावनांची भाषा आहे आणि प्रत्येक आकृती म्हणजे एका विचाराचा प्रवास आहे. आणि म्हणूनच ‘अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली’ हे नाव अत्यंत अर्थपूर्ण आहे,क्वांटम म्हणजे सूक्ष्मात दडलेले विराट विश्व जे इथे साकारलेलं आहे.रांगोळी म्हणजे काय? छोट्या बिंदूपासून विस्तार जाणारं विश्व . बिंदूपासून रेषा, रेषेपासून आकृती, आकृतीतून विश्व आणि त्या विश्वातून एक विचार हीच कलेची ताकद आहे.
या प्रदर्शनात रंगावली या पारंपरिक कलाप्रकाराची सांगड क्वांटम विचारांशी घालण्यात आली आहे. कॅनव्हासवर साकारलेल्या ड्राय फ्रेस्को (भिंतीच्या सुकलेल्या प्लास्टर वर रंगद्रव्य लावून चित्र काढण्याची पद्धती) चित्रांच्या माध्यमातून कलाकारांनी परंपरागत कलेतून आधुनिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कला, परंपरा आणि विज्ञान यांच्यातील वेगळे संबंध शोधण्याची संधी या प्रदर्शनातून कलाप्रेमींना मिळणार आहे.
या चित्रांमधून प्रेक्षकांना कलाकृतींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि त्यातील वेगळेपण अनुभवण्याची संधी मिळेल. तसेच, कलाप्रेमी आणि संग्राहकांना या कलाकृती खरेदी करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन १ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत खुले राहणार आहे.


