कथ्थक-भरतनाट्यम नृत्य, शास्त्रीय गायन, एकल तबलावादन आणि नाट्यसंगीत अशा विविध कलाविष्कारांनी ‘कावेरी परंपरा बालसंगीत महोत्सव’ दिमाखात पार पडला. रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या महोत्सवात बालकलाकारांच्या सुरेल व लयबद्ध सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला हा महोत्सव कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व पुणे फेस्टिव्हलच्या उपक्रमांतर्गत आयोजित केला जातो. यंदाही उत्स्फूर्त वातावरणात तो पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे, प्रख्यात तबलावादक निखिल फाटक आणि सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस उपस्थित होते. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, कन्नड शाळेचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष इंदिरा सालियन आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी यांनी सांगितले, “नव्या पिढीतील बालप्रतिभेला योग्य वेळी प्रोत्साहन देणे आणि कलेला शिक्षणाच्या प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. गेल्या २९ वर्षांपासून शास्त्रीय गायन व नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. कावेरी समूहातर्फे अनेक आश्वासक कलाकार घडलेले आहेत.”
या महोत्सवात डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल-गणेशनगर, डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल-बाणेर आणि कावेरी इंटरनॅशनल स्कूल-लोहगाव येथील विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत व नृत्याची मनोहारी सादरीकरणे केली. गायन, वादन आणि नृत्याच्या रंगारंग कार्यक्रमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
भरतनाट्यम एकल सादरीकरण विश्वराज मगर यांनी तर शास्त्रीय गायन कुहू शर्मा व राम गोडसे यांनी सादर केले. अनिश पारसनीस यांचे तबला वादन, कन्हाई निमसे यांचे नाट्यसंगीत, तर बाणेर शाखेतील विद्यार्थ्यांचे समूहगायन विशेष ठरले. रितिका भारती दासन यांनी भरतनाट्यम एकल नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाबाबत बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, “संगीताची साधना हा जीवनमूल्यांचा प्रवास आहे. या माध्यमातून भविष्यात अनेक दर्जेदार कलाकार घडतील.” तर शर्वरी जमेनीस यांनी सर्व बालकलाकारांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.
सुमारे तीन तास रंगलेल्या या महोत्सवाचे सूत्रसंचालन अश्विनी देवधर व गौतमी पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पल्लवी नाईक, अपर्णा लेले व अंजली कुलकर्णी यांनी केले.


