पुणे, दि. १ : ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि उपग्रहांचा वापराच्या तंत्रज्ञानांमुळे आता नैसर्गिक व मनुष्यनिर्मित ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धनांच्या संकल्पनांमध्ये मोठी क्रांती झाली आहे. या दोन्ही वारशांचे संदर्भ अधिक व्यापक, शाश्वत आणि दूरगामी परिणाम करणारे झाले असल्याचे निरीक्षण ‘शाश्वत भवितव्य आणि तंत्रज्ञानाची ताकद’ या ‘आंतरराष्ट्रीय परिषद ३.०’ मधून तज्ज्ञांनी नोंदवले. युनोस्कोने आखलेल्या ‘जागतिक वारसा स्वयंसेवक कार्यक्रम २०२५’ आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्टडीज’तर्फे (आयएसडीएस) ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक वन विभागातील पुणे क्षेत्राचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग उपस्थित होते. याशिवाय कोस्टारिका फ्लाईंग लॅबचे कार्लोस सैटो, भूतान फ्लाईंग लॅबचे संगय डोरजी, मेक्सिको फ्लाईंग लॅबचे डॉ. अल्बर्टो गॅलर्डो, वी रोबोटिक्सच्या सोनजा बेटचार्ट, रिच इंडिया मूव्हमेंटचे आर्किटेक्ट ओजस हिरानी हे ‘ऑनलाईन’ सहभागी झाले. महाराष्ट्रातील फार्मर्स फॉर फार्मर्सचे आदित्य अविनाशे, ग्रासलॅण्ड ट्रस्टच्या प्रोग्राम मॅनेजर झीनल वजरिणकर, सेवावर्धिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर आणि पूरातत्वशास्त्रज्ञ डॉ. नीलेश जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचे सादरीकरण केले.
आयएसडीएसच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ.अस्मिता जोशी तसेच प्रा. निधी दीक्षित लातूरकर यांनी या दोन्ही सत्रांचे नियंत्रक म्हणून काम पाहिले. या सत्रांना डब्ल्यूएचव्ही २०२५ मध्ये सहभागी झालेले देशभरातील निवडक स्वयंसेवक व डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) तिसऱ्या व चौथ्या वर्षांतील स्टूडेंट्स एसडीजी हबच्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेत त्यामध्ये बोलताना गर्ग यांनी राज्यातील वन विभागाजवळील मानवी वस्तींमध्ये वन्यप्राणी येण्याची पूर्वसूचना, तसेच वणव्यांची ठिकाणे यांची तात्काळ माहिती पुरवणे ‘इस्रो’ने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमधील दूरस्थ पाहणीतून (रिमोट सेन्सिंग) शक्य झाले आहे. तसेच जंगलांमधील वणवे, वन्यप्राण्याच्या हालचाली आणि त्यांची वर्तणूक ड्रोनच्या दृकश्राव्य चित्रणातून आणि एआयद्वारे तत्क्षणी समजणे शक्य झाले आहे. त्यानुसार घेतलेल्या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करणे शक्य झाले आहे.
कोस्टारिका फ्लाईंग लॅबचे कार्लोस सैटो यांनी जंगल व शेती असणारा प्रदेश गेल्या २५ वर्षात कसा बदलतो आहे याचे चित्रण ड्रोन व उपग्रहाद्वारे शक्य झाले असल्याने काही धोरणात्मक व भविष्यवेधी निर्णय घेणे सोपे झाले असल्याचे सांगितले.
भूतान फ्लाईंग लॅबचे संगय डोरजी यांनी सांगितले की, स्थानिक जंगलांमधील जैवविविधतेला असणारा महापुराचा धोका, तसेच हवामानातील बदल यांचे पूर्वसंकेत देण्यासाठी ड्रोनमार्फत विदा (डेडा) जमा करून शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकांसाठी आद्ययावत माहिती पुरवणे शक्य झाले आहे.
वी रोबोटिक्सच्या सोनजा बेटचाट म्हणाल्या की ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने बारा वर्षांपूर्वीच ब्राझील नॅशनल पार्कमधील वीज पडल्याने हाताची बोटे मोडलेल्या आठ मीटर उंचीचा ख्राईस्टचा पुतळा दुरूस्त केला होता. त्यासाठी त्रिमिती पोत असणाऱ्या जाळीच्या तंत्रज्ञानाचा (थ्रीडी टेक्शचर मेश) वापर करण्यात आला. त्यावरून नैसर्गिक आपत्तीपासून ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन कसे करता येईल यावर सध्या एआयच्या मदतीने अधिक संशोधन चालू आहे.
रिच इंडिया मूव्हमेंटचे आर्किटेक्ट ओजस हिरानी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने धर्म व इतिहासाचे जतन हे सांस्कृतिक वारसा स्थळांसाठी माहिती केंद्रे, ऐतिहासिक वारसा उद्याने व देशभरातील वारसा स्थळांच्या जतन संवर्धनाचा संयुक्त नियोजित आराखडा करणे आता शक्य होत आहे.
महाराष्ट्रातील फार्मर्स फॉर फार्मर्सचे आदित्य अविनाशे यांनी तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असणाऱ्या वृक्षारोपणांची अद्ययावत माहिती आणि त्यामधील पारदर्शकता आणणे शक्य झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या झाडांमुळे होत असणारा ‘कार्बन क्रेडीट’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक कमाई मिळवून देणे सोपे जात आहे.
ग्रासलॅण्ड ट्रस्टच्या झीनल वजरिणकर म्हणाल्या की, महाराष्ट्रातील विस्तीर्ण गवताळ प्रदेशांमधील लांडगे, तरस आणि कोल्हे यांच्यातील लांडगे शोधून त्यांचे स्थलांतर व वर्तणूकीचा अभ्यास ड्रोन व एआयच्या माध्यमातून करणे शक्य आहे. लांडग्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्यांचे जतन व संवर्धनाची धोरणे ठरवणे शक्य होईल.
‘सेवावर्धिनी’चे गिरीश देगावकर यांनी महाराष्ट्रातील बारवांचा (पायऱ्या उतरुन बांधण्यात आलेल्या प्राचिन विहिरी उर्फ स्टेपवेल) वापर त्या त्या परिसरातील आधुनिक पाणीपुरवठ्यासाठी करणे शक्य होत असल्याचे सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या अशा विहिरींकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या स्वच्छ करून त्यामधील शाश्वत जलप्रवाहाचा वापर करणे सोयीचे व कमी खर्चिक होत आहे.
डेक्कन कॉलेजमधील पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. नीलेश जाधव यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की पूरातत्त्वशास्त्रातील उत्खनन व पुनर्मांडणीतून इतिहास घडवताना मराठा लष्करी भूदृश्यकलेतील सुरक्षा,भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास वास्तूरचनाशास्त्राच्या मदतीने अधिक सुलभ
करणे शक्य झाले आहे.


