पुणे : भारत माता की जय… वंदे मातरम अशा घोषणांनी दुमदुमलेले चौक, महिलांनी सैनिका आणि पोलिसांचे केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि सैनिकांच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू… असे भावनिक आणि उत्साही वातावरण शहराच्या पूर्व भागात पाहायला मिळाला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिक व पोलिसांसोबत सद्भावना रॅली काढत राष्ट्रभक्तीचा आणि ऐक्याचा संदेश दिला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ, मोमीनपुरा परिसरात सद्भावना रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवृत्त कर्नल वसंत बल्लेवार, खडक पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस उप निरीक्षक असगर अली सय्यद, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, विनायक घाटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अॅड. सुभाष मोहिते, डॉ. मिलींद भोई, राजाभाऊ कदम, भाऊसाहेब थोरात, अभिषेक मारणे, युसुफ बागवान, साजिद पिंजारी, सेवा मित्र मंडळ अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाणे, राजाभाऊ महाडिक, विक्रांत मोहिते, अजय पंडित, लाला परदेशी ,राजेंद्र काळभोर उपस्थित होते.
शर्मिला सुतार म्हणाल्या, सैनिक देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले भविष्य धोक्यात घालतात, त्यामुळे आपण सुरक्षित असतो. आज सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन त्यांच्या सन्मानासाठी असे उपक्रम राबवितात, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
वसंत बल्लेवार म्हणाले, जेव्हा सर्वधर्मीय नागरिक सैनिकांची सेवा करण्यासाठी पुढे येतात तेव्हा आमचे सैनिक भावूक होतात. त्यांना आपल्या कार्याचे चीज झाल्यासारखे वाटते. सैनिक हे देशाच्या सैन्याचा अभिमान आहेत. आपण सर्व एक आहोत, म्हणून देशावर आलेले कोणतेही संकट आपण सहज परतवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, काही काळापूर्वी समाजात जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम झाले होते. त्यावेळी तो द्वेष कमी करण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घेऊन सद्भावना रॅलीची सुरुवात केली. सर्व धर्मीय नागरिक अपंग सैनिकांची व्हीलचेअर पुढे नेण्यासाठी एकत्र आले होते. भोजन प्रसादाच्या वेळी हात नसलेल्या सैनिकांना भरवण्यासाठीही सर्वधर्मीय नागरिक पुढे आले. ज्या वाटेवर धर्माच्या द्वेषाचे काटे पसरले होते, त्या वाटेवर एकतेची फुले उधळली गेली. आजही ती परंपरा सुरू असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.


