पुणे दि. 4 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) :- पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू होत असून या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक खासगी चारचाकी वाहनांसाठी देखील राखून ठेवता येणार आहेत. यासाठी संबंधित वाहन मालकांनी मूळ शुल्काच्या तीनपट रक्कम भरून अर्ज करणे आवश्यक आहे.
नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हव्या असलेल्या वाहनमालकांनी विहित नमुन्यात अर्ज करून 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लिलावासाठी धनाकर्ष (डीडी) 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील व दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव पार पडेल.
दुचाकी वाहनमालकांनी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर दुपारी 2.30 वाजेपर्यंत आहे. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास त्याची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लिलावासाठी धनाकर्ष 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील व त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव केला जाईल.
सर्व अर्ज खासगी वाहन नोंदणी विभागात ‘आर.टी.ओ., पुणे’ यांच्या नावे धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती तसेच आधारकार्डाशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जमा करावेत.
आकर्षक किंवा पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.


